बारामती : बारामती तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी २९९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकूण ३१ गट उमेदवार आणि ४३ गण उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. अंतिम निकाल उद्या (दि. ९) जाहीर होणार असून, कोण गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात पार पडणारी ही जिल्हा परिषद व पंचायत समितीची गेल्या ४० वर्षांतील पहिलीच निवडणूक ठरली. त्यांच्या निधनामुळे कोणत्याही पक्षाने प्रचार सभा न घेता निवडणूक प्रक्रिया पार पडली. प्रचार सभांशिवाय पार पडलेली ही बारामतीच्या इतिहासातील पहिलीच निवडणूक ठरली आहे.
शनिवारी मतदानादरम्यान मतदारांमध्ये अजित पवार यांच्या आठवणींमुळे भावनिक वातावरण दिसून आले. मात्र त्याचवेळी निरुत्साहाचेही चित्र अनेक मतदान केंद्रांवर पाहायला मिळाले. बहुतांश ठिकाणी तुरळक गर्दी होती. सकाळी ९:३० वाजेपर्यंत केवळ ६.५२ टक्के मतदान झाले होते. ११:३० पर्यंत हे मतदान १६.९१ टक्क्यांवर, दुपारी १.:३० वाजेपर्यंत ३४.५८ टक्के आणि दुपारी ३:३० वाजेपर्यंत अवघे ४०.८५ टक्के मतदान झाले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ७) सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी राज्यातील नागरिकांना लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
मतदानासाठी जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अजितदादांचे राज्याच्या राजकारणातील योगदान आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी पार्थ पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार आणि युगेंद्र पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत अजित पवार यांचा सकाळी लवकर मतदान करण्याचा शिरस्ता यावेळी कायम राखण्यात आला. तसेच पिंपळी येथे आमदार रोहित पवार, त्यांच्या पत्नी कुंती पवार, राजेंद्र पवार आणि सुनंदा पवार यांनीही मतदान केले.
भरणेवाडीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे रांगेत उभे राहून मतदान
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडीतील बोराटेवस्ती मतदान केंद्रावर जाऊन सर्वसामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून त्यांनी लोकशाही प्रक्रियेचा आदर्श वस्तुपाठ मांडला. प्रत्येक नागरिकाने मतदान करणे ही लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले.
Web Summary : Baramati ZP elections saw a low 40.85% turnout. Marked by emotional tributes to Ajit Pawar, parties avoided rallies. Sunetra Pawar voted, urging participation. Minister Dattatraya Bharne stood in line to vote, promoting civic duty.
Web Summary : बारामती जिला परिषद चुनावों में केवल 40.85% मतदान हुआ। अजित पवार को श्रद्धांजलि दी गई, पार्टियों ने रैलियों से परहेज किया। सुनेत्रा पवार ने मतदान किया, भागीदारी का आग्रह किया। मंत्री दत्तात्रय भरणे ने लाइन में खड़े होकर मतदान किया, नागरिक कर्तव्य को बढ़ावा दिया।