Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:03 IST2025-11-28T13:01:24+5:302025-11-28T13:03:06+5:30
आता केवळ निवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध
पुणे : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका केव्हा होतील, याबाबत संभ्रम कायम असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. या याद्या सर्व तहसीलदार कार्यालयांत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता केवळ निवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या गटनिहाय अंतिम मतदार याद्या १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याची प्रतीक्षा होती. त्यानुसार गुरुवारी (दि. २७) केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. या याद्या आता तहसीलदार कार्यालयांत प्रसिद्ध केल्या आहेत. त्या सर्व मतदारांना पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ केंद्रांची संख्या आहे. प्रत्येक केंद्रनिहाय या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी याआधी सलग तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २७ ऑक्टोबरलाच या याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतु, पहिल्यांदा १२ नोव्हेंबरपर्यंत, दुसऱ्यांदा २४ नोव्हेंबरपर्यंत तर तिसऱ्यांदा २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून या मतदार याद्यांची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे.
यानंतर आता निवडणुकीच्या कार्यक्रमाची जाहीर घोषणा करण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी आरक्षणाबाबत होणाऱ्या सुनावणीकडे सबंध राज्याचे लक्ष लागून आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची घोषणा होणे अपेक्षित आहे.