पुणे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपनेही व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेला शिंदेसेनेला बरोबर घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची येत्या दोन-तीन दिवसांत बैठक होणार असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ७५ पैकी ४२ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यापाठोपाठ शिवसेना १४, भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ७ सदस्य होते. मात्र, यावेळी अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. अजित पवार गट हा भाजप आणि शिंदेसेनेबरोबर सत्तेत सहभागी झाला असला, तरी नुकत्याच झालेल्या नरगपरिषद निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचीच हवा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवून दिले आहे. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे दोन्ही गट शक्य तिथे एकत्र आले आहेत. अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी एकत्रीकरणाचा पॅटर्न चालल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात कशी राहील, यादृष्टीने दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या पॅटर्नबरोबरच भाजप आणि शिंदेसेनतील नाराजांना थेट राष्ट्रवादीच्या गोटात घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
खेडमध्ये शिंदेसेना-भाजप एकत्र लढण्याची शक्यता
गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) दाखल झाले होते. डॉ. अमोल कोल्हे हे खासदार झाले. त्या काळात दिलेली काही आश्वासने पाळली न गेल्यामुळे नगरपरिषद निवडणुकीमध्ये देशमुख हे शिंदेसेनेत दाखल झाले. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी नगरपरिषदेमध्ये शिंदेसेनेला लक्षणीय यश मिळाले. हेच यश अतुल देशमुख यांच्या पथ्यावर पडले आहे. इतकेच नाही तर तालुक्यातील शिंदेसेनेची आगामी निवडणुकीतील व्यूहरचनेची सर्व जबाबदारी अतुल देशमुख यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजते. त्याअनुषंगाने त्यांनी गट आणि गणांमध्ये इच्छुकांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल होणार असल्यामुळे भाजपला कोणीच वाली राहिला नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे उर्वरित भाजप पदाधिकाऱ्यांशी सलगी करत राष्ट्रवादीला थांबवण्यासाठी खेडमध्ये शिंदेसेना-भाजप एकत्र लढण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
आंबेगाव-शिरुरला आढळराव-पाटील यांची भूमिका ठरणार महत्त्वपूर्ण
आंबेगाव तालुक्यामध्ये ‘म्हाडा’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे. उत्तर पुण्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगाव आणि शिरुरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यश मिळवण्यामध्ये त्यांचा माेलाचा वाटा होता. नगरपरिषद निवडणुकीमध्ये आढळराव-पाटील समर्थकांना बाजूला ठेवण्यात आल्यामुळे या समर्थकांनी त्यांना वेगळी भूमिका घेण्यासाठी दबाव टाकाला आहेच याशिवाय अन्य काही घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून आढळराव-पाटील यांनी अलिप्त राहणेच पसंत केल्याची चर्चा आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपूर्वी नगरपंचायतीसंदर्भात आढळराव-पाटील आणि दिलीप वळसे-पाटील यांची भेट झाली. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चाही केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास तालुक्यात अनुकूल वातावरण नसून या ठिकाणी चौरंगी किंवा पंचरंगी लढतीची शक्यता आहे. आढळराव-पाटील यांचा भूतकाळ पाहिला तर त्यांना मानणारा शिवसेनेतही मोठा गट आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
चार तालुक्यांत भाजपची ताकद मोठी
जिल्ह्यातील शिरूर, दौंड येथे भाजपची पूर्वीपासूनच ताकद आहे. त्यातच अलीकडे माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे हे भाजपमध्ये दाखल झाले असल्याने अनुक्रमे पुरंदर आणि भोर या दोन तालुक्यांतही भाजपची ताकद वाढली आहे. या चारही तालुक्यांत कोणालाही बरोबर न घेता स्वबळावर भाजप निवडणूक लढवू शकते. परंतु, राष्ट्रवादीला राेखण्यासाठी या ठिकाणी काही जागांची वाटाघाटी करून शिंदेसेनेला बरोबर घेण्याची तयारी सुरू झाली आहे. दुसरीकडे जुन्नरमध्येही शिंदेसेनेचे प्राबल्य अधिक असले तरी तीन-चार गट आणि गणांमध्ये भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे या ठिाकणी शिंदेसेना स्वत: भाजपला बरोबर घेण्यास उत्सुक असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
इंदापूरला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप
इंदापूर तालुक्यात नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले होते. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रदीप गाटकर हे भाजपच्या गोटात दाखल होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही भाजपमध्ये जाण्यास मुहूर्त शोधत असल्याची चर्चा आहे. यामुळे पुन्हा एकादा इंदापूरला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे बाराबमतीमध्येही चंचुप्रवेश करण्याचे मनसुबे भाजपने आखले आहेत.
पाच तालुके ठरवणार जिल्हा परिषदेची सत्ता
जिल्ह्यातील इंदापूर, खेड, जुन्नर तालुक्यांमध्ये प्रत्येकी आठ गट, तर शिरूर आणि दौंडमध्ये प्रत्येकी सात गट आहेत. या पाच तालुक्यांमध्ये ज्या पक्षाचे सर्वाधिक सदस्य असतील त्या पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता असणार आहे. दरम्यान, ७३ पैकी ३७ गट हे महिलांसाठी राखीव आहेत.
Web Summary : BJP strategizes with Shinde Sena to counter NCP in upcoming Zilla Parishad elections. Factions within NCP are consolidating, prompting BJP to seek alliances, especially in key districts like Khed and Junnar, while focusing on its strengths in Shirur and Daund.
Web Summary : जिला परिषद चुनावों में राष्ट्रवादी कांग्रेस का मुकाबला करने के लिए भाजपा ने शिंदे सेना के साथ गठबंधन की रणनीति बनाई है। राष्ट्रवादी कांग्रेस के भीतर गुटों के एकीकरण से भाजपा गठबंधन की तलाश में है, खासकर खेड़ और जुन्नार जैसे जिलों में, जबकि शिरूर और दौंड में अपनी ताकत पर ध्यान केंद्रित कर रही है।