पुणे : महापालिका निवडणुकीत मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या हजारांहून अधिक तक्रारी आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता दोनऐवजी चारपट केली आहे. महापालिका निवडणुकीत बंद पडलेली ही सर्व यंत्र भोसरी येथील गोदामात सीलबंद करून ठेवली असून, नगरपरिषदा व महापालिकेच्या निवडणुकीत वापरलेल्या सुस्थितीत असलेल्या यंत्रांचा वापर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ३ हजार ६०५ मतदान केंद्र असून, १४ हजारांहून अधिक मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे.
नगरपरिषदा व त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मतदान यंत्र अर्थात इव्हीएम व कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती. यंत्रांची उपलब्धता कमी असल्याने मतदान यंत्र बदलविण्यासाठी मोठा काळ गेला. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून आल्या. त्याचा फटका साडेपाचनंतरही अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र नगरपरिषदा क्षेत्रामध्ये तसेच महापालिकेच्या निवडणुकीत दिसून आले. त्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची उपलब्धता चारपट करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या निर्देशानुसार मतदान यंत्रांच्या संख्येनुसार २२० टक्के अर्थात दुपटीहून अधिक यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३ हजर ६०५ मतदान केंद्रांवर ७ हजार ९३१ मतदान यंत्र व ३ हजार ९६६ कंट्रोल युनिट देण्यात आले होते. मतदान प्रक्रिया सुरू असताना यंत्रे व कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतर तातडीने बदलण्यासाठी आता जिल्ह्यातील ३ हजार ६०५ मतदान केंद्रांवर १४ हजार ४० मतदान यंत्र व ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत एकूण १ हजार १९२ मतदान यंत्र व ८१२ कंट्रोल युनिट बंद पडले होते. हे सर्व नादुरुस्त यंत्रे जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक ४०० मतदान केंद्र इंदापूर तालुक्यात असून, यासाठी १ हजार ६६४ मतदान यंत्र व ६६० कंट्रोल युनिट देण्यात आले आहेत. सर्वांत कमी १०५ मतदान केंद्र वेल्हा तालुक्यात असून, तेथे ४३७ मतदान यंत्र व १७३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तालुकानिहाय यंत्रांची उपलब्धता
तालुका == कंट्रोल == युनिट == मतदान यंत्र
जुन्नर == ३६६ == ५६२ == ९२८
मावळ == २४३ == ४०२ == ७३२आंबेगाव == २३९ == ३०९ == ९९४
खेड == ३३७ == ५५६ == १४०२शिरूर == ३३७ == ५५६ == १४०२
मुळशी == २२७ == ३७५ == ९४५हवेली == २६३ == ४२५ == १०१३
दौंड == ३१७ == ५२३ == १३१८पुरंदर == २३५ == ३८८ == ९७७
वेल्हा == १०५ == १७३ == ४३७भोर == २३७ == ३९१ == ९८५
बारामती == २९९ == ४९३ == १२४३इंदापूर == ४०० == ६६० == १६६४
एकूण == ३६०५ == ५८१३ == १४०४०
महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मतदान यंत्र व कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतर तातडीने नवीन यंत्र व कंट्रोल युनिट बदलण्यासाठी यंत्रांची उपलब्धता चार पट करण्यात आली आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक यंत्रे व्यवस्थापन कक्ष
Web Summary : Following EVM failures in municipal polls, Zilla Parishad elections will have four times more machines. 14,040 EVMs are now available for 3,605 centers to avoid delays.
Web Summary : नगरपालिका चुनावों में ईवीएम खराब होने के बाद, जिला परिषद चुनावों में चार गुना अधिक मशीनें होंगी। देरी से बचने के लिए 3,605 केंद्रों के लिए 14,040 ईवीएम उपलब्ध हैं।