तरुणाईच्या प्रयत्नांतून जुन्नरच्या ‘पर्यटन मॉडेल’ला यश

By Admin | Updated: September 27, 2015 01:25 IST2015-09-27T01:25:28+5:302015-09-27T01:25:28+5:30

पर्यटकांना आकर्षित करेल असे निसर्गाचे वरदान अनेक भागांना लाभलेले असते; परंतु त्याचे प्रभावी मार्ग सापडतातच असे नाही.

Yunna's 'Tourism Model' has achieved success due to youth efforts | तरुणाईच्या प्रयत्नांतून जुन्नरच्या ‘पर्यटन मॉडेल’ला यश

तरुणाईच्या प्रयत्नांतून जुन्नरच्या ‘पर्यटन मॉडेल’ला यश

अशोक खरात, खोडद
पर्यटकांना आकर्षित करेल असे निसर्गाचे वरदान अनेक भागांना लाभलेले असते; परंतु त्याचे प्रभावी मार्ग सापडतातच असे नाही. जुन्नरमध्ये तरुणांच्या पुढाकाराने साकारलेल्या ‘पर्यटन मॉडेल’मुळे मात्र जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यात यश येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पर्यटनाच्याबाबतीत अग्रेसर असलेला जुन्नर तालुका आता खऱ्या अर्थाने पर्यटकांच्या नजरेत भरू लागला आहे.
पुण्या-मुंबईतील नागरिकांना पर्यटनासाठी जुन्नर तालुक्यामध्ये आकर्षित करता यावे, यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आणि जुन्नर व परिसरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती संकलित करून पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना गाईडद्वारे जुन्नर फिरवून एखाद्या ग्रामीण पर्यटन केंद्रात मुक्कामी व्यवस्था असल्यामुळे, आलेल्या पाहुण्यांना जुन्नरच्या अस्सल पर्यटनाचा आस्वाद मिळत आहे. आता ५ वर्षांनंतर हे ‘जुन्नर पर्यटन मॉडेल’ इतरही तालुक्यांसाठी आदर्श मॉडेल ठरू लागले आहे. जुन्नर मॉडेल ही त्रिस्तरीय संकल्पना आहे, ज्यामध्ये जुन्नर पर्यटन विकास संस्था, हचिको टुरिझम आणि पराशर कृषी व ग्रामीण पर्यटन हे वेगवेगळ्या पातळीवर काम करतात. ‘जुन्नर मॉडेल’ची सुरुवात २०१० पासून जुन्नरमधील राजुरी या गावी झाली. मनोज हाडवळे यांनी कृषी पदवी मिळवून २ वर्षे वर्धा येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम केले. जुन्नरमध्ये उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी, जुन्नरचे वैभवशाली वैविध्य आणि त्याचा पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उपयोग या सर्व गोष्टींचा विचार करून, नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ जुन्नर पर्यटनासाठी काम सुरू केले.
जुन्नरमधील गड-किल्ले, प्राचीन मंदिरे, निसर्ग, घाट, लेण्या, लोकसंस्कृती एवढेच नाही, तर येथील डोंगर-दऱ्याखोऱ्या देखील इथे रोजगार निमिर्ती करू शकतात, हे त्यांच्या लक्षात आले. जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून त्याने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना एकत्र केले.
माजी सैनिक रमेश खरमाळे हे पश्चिम घाट परिसरातील काम पाहतात, प्रा. विनायक खोत हे दुर्ग संवर्धनासाठी कार्य करतात, राजकुमार डोंगरे हे वनस्पती अभ्यासक म्हणून विविध वनस्पतींची माहिती संकलित करतात, सुभाष कुचिक हे पर्यावरण अभ्यासक व पक्षिनिरीक्षक म्हणून तालुक्यातील कायमस्वरूपी व स्थलांतरित पक्ष्यांची माहिती संकलनाचे काम करतात.
अमोल कुटे हे छायाचित्रकार म्हणून निसर्गाचे फोटोसेशनसाठी प्रसिद्ध आहेत, तर बापूजी ताम्हाणे हे तालुक्यातील जैन लेण्या, बुद्धलेण्या, शीलालेख आदी गोष्टींचे दांडगे अभ्यासक आहेत.
फेसबुकवर ‘जुन्नर पर्यटन विकास संस्था व निसर्गरम्य जुन्नर’ हे पेज तयार करण्यात आले असून, त्यामुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण करण्यात ते यशस्वी
ठरले आहेत. ‘सोशल मीडिया’चा वापर करून हे जुन्नरचे वैभव जगाच्या कानाकोपऱ्यांत पोहोचविण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला़.

Web Title: Yunna's 'Tourism Model' has achieved success due to youth efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.