युवकांनी घेतला बुद्धलेण्यांच्या संवर्धनाचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:04+5:302020-11-29T04:05:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांची दुरवस्था होत आहे. ही दुरवस्था ...

युवकांनी घेतला बुद्धलेण्यांच्या संवर्धनाचा ध्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांची दुरवस्था होत आहे. ही दुरवस्था पाहून जुन्नर तालुक्यातील युवकांनी एकत्र येऊन ‘प्रबुद्ध भारत’ नावाची संस्था स्थापन करत तालुक्यातील लेण्यांच्या सवंर्धनाचा वसा हाती घेतला आहे. ५० युवकांचा गट गेल्या वर्षापासून श्रमदानातून बुध्दलेण्यांची स्वच्छता राखत लेण्यांचे जतन करत आहे.
जुन्नर तालुक्यात बुद्धलेण्या मोठ्या प्रमाणात आहेत. लेणी अभ्यासक व विदेशी पर्यटक या लेणी पाहण्यासाठी येतात. अत्यंत प्राचीन आणि बुद्ध संस्कृतीचा वारसा असणाऱ्या या लेण्यांची शासनाच्या उदासीनतेमुळे दुरवस्था होत चालली आहे. अनेक लेणी समूहातील लेणी व लेण्यांचा परिसर मूलभूत सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे पर्यटकांना अडसर निर्माण होत होता.
बौद्ध धम्मात पावसाळ्यात वर्षावासाला अनन्यसाधारण महत्व आहे. वर्षभर बौद्ध भिक्कूंनी बाहेर फिरून धम्माचा प्रचार व प्रसार करायचा. पावसाळा सुरू होताच लेण्यांमध्ये येऊन पावसाळा संपेपर्यंत तिथेच वास्तव्य करायचे असे वर्षावासाचे महत्व आहे. या काळात या लेण्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जायचा. पर्यटक व लेणी अभ्यासक देखील दरवर्षी पावसाळ्यात या लेण्यांना भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र पावसाळ्यात लेण्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांमध्ये गवत व झाडी झुडपे वाढल्याने लेण्यांकडे जाणे धोक्याचे ठरत आहे.
प्रबुद्ध भारत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश बिंबाजी वाव्हळ यांच्या नेतृत्वाखाली दर रविवारी सकाळी तालुक्यातील युवक प्रत्येक लेणीवर जाऊन श्रमदान करत आहेत. ययुवकांनी लेण्यांच्या रस्त्यावरील गवत काढून रस्ता मोकळा केला आहे. लेण्यांच्या परिसरात देखील गवत काढून व सर्व कचरा गोळा करून निसर्गाला बाधा न पोहचवता त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे. काही ठिकाणी पिंपळाची झाडे लावून वृक्षारोपण देखील केले आहे. लेण्यांच्या परिसरातील पाण्याच्या टाक्या माती, दगड व कचऱ्याने गाडल्या गेल्या होत्या.या टाक्यांमधील दगड,माती व कचरा श्रमदान करून बाहेर काढले व या सर्व टाक्या मोकळ्या करून स्वच्छ केल्या आहेत.
=================================
लेण्यांच्या माध्यमातून जुन्नर मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन पाहायला मिळत आहे. या बुद्धलेण्यांच्या माध्यमातून आपल्याला बुध्दसंस्कृती अभ्यासण्याची खूप मोठी संधी आहे. पुरातत्व विभागाने हा वारसा जपण्यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या उपक्रमातून युवकांना श्रमदान केल्याचा आनंदही मिळत आहे आणि लेण्यांचा परिसर स्वच्छ देखील होत आहे.
- गणेश बिंबाजी वाव्हळ, संस्थापक - अध्यक्ष
प्रबुद्ध भारत फाऊंडेशन
=================================
कॅप्शन : प्रबुद्ध भारत फाऊंडेशनचे युवक मागील एक वर्षापासून जुन्नर मधील लेण्यांमध्ये श्रमदान करून लेणी संवर्धनाचे कार्य करत आहेत.