पुणे : मकरसंक्रांत जवळ आली की, पतंगबाजी सुरू होते. नायलॉन मांजावर बंदी असताना सर्रास त्याचा वापर करण्यात येतो. या नायलॉन मांजामध्ये पक्षी अडकून जखमी होत असून, काहींचा जीव देखील जात आहे. मंगळवारी (दि.१४) शहरामध्ये वीसहून अधिक पक्षी मांज्यामध्ये अडकल्याच्या घटना समोर आल्या. ज्यांची नोंद झाली नाही, अशा कित्येक घटना असू शकतील.
आपला पतंग अधिकाधिक उंच जायला हवा, यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यात येतो. खरंतर काही वर्षांपासून या नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील बाजारात ते उपलब्ध आहेत. संबंधित दुकानदारांवर पोलीसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. ती होत नाही. खरंतर बाजारातच नायलॉन मांजा आला नाही, तर त्याचा वापरच होणार नाही. पण शहरात सर्वत्र नायलॉनचा मांजा वापरला जात आहे. त्यामुळे त्यात पक्षी अडकून जखमी होत आहेत. अनेक दुचाकीस्वारांनाही या मांजामुळे त्रास सहन करावा लागला आहे.
मंगळवारी मकरसंक्रांत असल्याने शहरातील मोकळ्या ठिकाणी, टेकडीवर, उंच इमारतीवर, पुलांवर पतंगबाजी करण्यात येत होती. त्यातील सर्वांकडे नायलॉन मांजा पहायला मिळत होते. या लोकांवर कारवाई करणारे पथक असणे गरजेचे आहे, अन्यथा त्याशिवाय त्याचा वापर बंद होणार नाही, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली.
अन् घार उडाली आकाशी !
सिंहगड रस्त्यावर कॅनॉलच्या बाजूला एका झाडावर मोठी घार नायलॉन मांजामध्ये अडकली होती. त्यामुळे घारीला उडता येत नव्हते. तेथील स्थानिक नागरिक आशिष फडणीस यांनी हे दृश्य पाहिले आणि त्यांनी लगेच कात्रीने नायलॉन मांजा कापला. त्यानंतर ती घार लगेच उडून गेली.
फायर ब्रिगेडकडे एक कॉल !
शहरात कुठे मांजामध्ये पक्षी अडकला की, फायर ब्रिगेडचे जवान सोडविण्यासाठी बोलावले जाते. मंगळवारी त्यांच्याकडे कसबा पेठेतून केवळ एकच कॉल आला होता. मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्याला जवानामुळे जीवदान मिळाले.
रेस्क्यूकडे अनेक तक्रारी !
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टकडून शहरात मांजामध्ये अडकलेल्या पक्ष्यांची सुटका केली जाते. त्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहिम राबविली जाते. त्यांच्याकडे मंगळवारी दिवसभरा १० पेक्षा अधिक तक्रारी आल्या. त्या पक्ष्यांना रेस्क्यू टीमने सुटका केली. जखमी पक्ष्यांवर उपचार केले. रेस्क्यू टीमच्या सदस्य सायली पिलाने हिने एकट्या ८ ठिकाणी जाऊन मांजामधील अडकलेले पक्षी सोडविले.