पुण्यातील तरुणी दुबईमध्ये झळकली, जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:11 IST2021-04-08T19:08:16+5:302021-04-08T19:11:42+5:30
आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील आयर्नमॅन स्पर्धेत मिळवले होते यश

पुण्यातील तरुणी दुबईमध्ये झळकली, जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत निवड
पुणे शहरातील नुपूर पाटील यांनी दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या आयर्नमॅन २०२१ या स्पर्धेत उल्लेखनीस यश मिळविले आहे. स्पर्धेतील विशेष कामगिरीमुळे ‘जागतिक आयर्नमॅन’ स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. ऑगस्ट महिन्यात हि स्पर्धा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाच्या क्षेत्रामध्ये ‘आयर्नमॅन २०२१’ या स्पर्धेला विशेष महत्व आहे. या स्पर्धेमध्ये दुबई येथील जुमेरा बीच वर दोन किमी पोहणे, त्यानंतर लगेच ९० किमी सायकल चालवणे, त्यानंतर २१ किमी धावणे हे सर्व पार करून पुढे जावे लागते. नुपूर यांनी ७ तास २७ मिनिटात ही कठीण स्पर्धा पूर्ण करत महाराष्ट्राच्या विशेष प्राविण्याची मोहोर उमटविली आहे. त्यांचे या विशेष कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
जगभरातून अनेक असणारे खेळाडू उत्साहाने सहभाग घेत असतात. यावर्षी ही स्पर्धा ‘सोन्याचे शहर’ समजले जाणा-या दुबई या देशात आयोजित करण्यात आली होती. दुबई येथे होणारी ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा ‘जागतिक आयर्नमॅन’ या स्पर्धेत प्रवेश मिळविण्यासाठी विशेष महत्वाची मानली जाते.
नुपूर पाटील मुळच्या नगरच्या आहेत. ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांची नात ,तसेच राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भाची आहेत. त्यांची आरोग्य व आहार क्षेत्रामध्ये जवळपास दहा वर्षाची कारकीर्द पूर्ण झाली आहे.
पुण्याच्या सेंट हेलीना स्कूलमधून प्राथमिक, अहमदनगरच्या सेकेड हार्ट कॉन्वेट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतलेल्या नुपूर यांनी फिलिपिन्समध्ये कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेतलेले आहे. नुपूर यांनी या स्पर्धेच्या यशामागे ख-या अर्थाने तिचे कुटुंबासह तिच्या प्रशिक्षकाचे योग्य मार्गदर्शन तसेच पती रुषभ पाटील यांचे प्रोत्साहन महत्वपूर्ण ठरल्याचे नुपूर यांनी सांगितले.