राजू हिंगे
पुणे : नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमुळे महापालिकेचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर झाले आहे. तसेच लोकसंख्या ५० लाखांहून अधिक आहे. हे चित्र पाहता केंद्र सरकारच्या स्टॅन्डिंग फायर अॅडव्हायजरी कमिटीच्या निकषानुसार पुण्याला ७४ अग्निशमन केंद्राची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ २० केंद्र अस्तित्वात आहे. वाढत्या आगीच्या घटना पाहता, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.
शहरात आग लागणे, भिंत पडणे यासह विविध दुर्घटना घडल्यावर पहिला कॉल अग्निशमन दलाला केला जातो. प्रत्यक्षात केंद्र ताेकडी असल्याने दुर्घटना घडल्यानंतर स्पाॅटवर पाेहोचण्यास माेठा विलंब हाेऊन माेठे नुकसान हाेताना दिसत आहे.
निकष काय?
- स्टॅन्डिंग फायर अँडव्हायजरी कमिटीच्या निकषानुसार शहराची लोकसंख्या आणि हद्दीचा विचार करता शहराच्या पहिल्या १ लाख लोकसंख्येसाठी १, तर त्यापुढील प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी १ केंद्र असावे, असा निकष आहे.- दुसऱ्या निकषानुसार १० किलोमीटरच्या हद्दीत १ केंद्र असावे, असे नमूद आहे. अन्य निकषात दाट वस्तीत २० टक्के आणि धोका असलेल्या भागात आणखी काही केंद्र उभारणे आवश्यक आहे.- पुण्याचे क्षेत्रफळ ५१८ चौरस किलोमीटर झाले आहे. वरील निकषांचा विचार करता पुण्यातील अग्निशमन केंद्राची संख्या ७४ ते ७५ असणे आवश्यक आहे.
तब्बल ५२७ जागा रिक्त :
क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका झाली आहे. शहराच्या सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या अग्निशमन दलातील ९१० पैकी तब्बल ५२७ जागा रिक्त आहेत. केवळ ४५ टक्के कर्मचाऱ्यावर कारभार सुरू आहे. संभाव्य धाेका विचारात घेता महापालिका, नगरपंचायती, नगरपालिकांमध्ये अतिशय संवेदनशील अशा अग्निशमन विभागाची संख्या आणि त्यातील कर्मचारी संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे.
भरती कधी हाेणार?
राज्यातील अग्निशमन सेवा संचालयाने मार्च २०१८ मध्ये सामाईक सेवा प्रवेश नियमावली तयार करून राज्याच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केली होती. त्याला साडेतीन वर्षांनंतर म्हणजे ७ जून २०२२ रोजी मान्यता मिळाली. आता महापालिका आयुक्त आणि सामान्य प्रशासन विभागाने भरतीबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
शहरातील सद्य:स्थिती काय?
अग्निशमन केंद्राचे मुख्यालय भवानी पेठेत आहे. नायडू, कसबा, येरवडा, धानोरी, औंध, पाषाण, एरंडवणा, सिंहगड, नवले (धानोरी), वारजे, जनता, कात्रज, गंगाधाम, कोंढवा खुर्द, हडपसर, काळेपडळ, बीटी कवडे, कोथरूड असे एकूण २० ठिकाणी अग्निशमन केंद्र आहे.
उपनगरांत गाडी पोहोचण्यास लागतो वेळ
अग्निशमन दलाची केंद्र प्रामुख्याने शहराच्या मध्यवस्तीत आहेत. त्यामुळे उपनगरामध्ये एखादी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी तेथे पाेहाेचायला विलंब हाेताे. जास्त अंतर आणि वाहतूक कोंडीमुळे माेठी गैरसाेय हाेते. त्यामुळे अनेकदा वेळेत गाड्या पोहोचलेल्या नाहीत, अशी तक्रार हाेते.
वर्षे आगीसह घटलेल्या विविध घटनांची संख्या
२०१७ - ४ हजार ८१९२०१८ - ५ हजार ०१४२०१९ - ५ हजार ०२४२०२० - ४ हजार ७००२०२१ - ३ हजार ७९९
''शहराच्या सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या अग्निशमन दलातील ९१० पैकी तब्बल ५२७ जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी आवश्यक नियमावलीला मान्यता दिली आहे. येत्या काही महिन्यांत या जागा भरण्यात येतील. -सचिन इथापे, उपायुक्त, प्रशासन विभाग, महापालिका.''
''शहराची गरज लक्षात घेऊन येत्या काही महिन्यांत नवीन अग्निशमन केंद्र सुरू होतील. अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे; परंतु कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. -देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका.''