पुणे : एकतर्फी प्रेमातून बिबवेवाडी परिसरामध्ये १३ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा निर्घृण खून प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, या प्रकरणातील आरोपीला फिर्यादीने ओळखले आहे. तसेच, शुभम ऊर्फ हृषीकेश भागवत यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरल्याची साक्ष फिर्यादीने दिली. सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी न्यायालयामध्ये फिर्यादीची साक्ष नोंदवली.शुभम हा दुचाकीवरून त्याच्या दोन अन्य साथीदारांसह घटनास्थळी आला. यावेळी त्या ठिकाणी गाडी पार्क करीत तो पीडितेच्या दिशेने गेला. पीडितेने ‘तू इथे का आलास?’ अशी विचारणा करताच भागवत याने हातातील सुरा घेऊन पीडितेचे तोंड दाबत गळा चिरला. याखेरीज अन्य आरोपींनीही तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने आम्ही आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी आमच्या एका सहकार्याने भागवत याच्या हातातून चाकू हिसकावला. त्यानंतर भागवत याने पिस्तूल काढत पीडितेच्या मैत्रिणीच्या दिशेने रोखत जवळ आल्यास गोळी झाडण्याची धमकी दिली. भागवत याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडितेवर चाकूने सपासप वार केले. पीडितेचा जीव गेल्यानंतर आरोपीसह त्याचे साथीदार घटनास्थळावरून फरार झाल्याची साक्ष फिर्यादी यांनी न्यायालयासमोर दिल्याची माहिती ॲड. झंजाड यांनी दिली. यावेळी आरोपीला येरवडा कारागृहातून न्यायालयात हजर करण्यात आले होते.१२ ऑक्टोबर २०२१ रोजी बिबवेवाडी येथील एका लॉन्सवर हा प्रकार घडला. त्या मुलीने प्रेमास नकार दिला आणि फोनवर बोलण्यास टाळाटाळ केल्यामुळे शुभम ऊर्फ हृषीकेश बाजीराव भागवत (२२) याने क्रूर पद्धतीने तब्बल ४२ वार करून हा खून केला होता. या प्रकरणाची चर्चा विधानसभेतही झाली होती. शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ माजवलेल्या गुन्ह्यात भागवतविरोधात आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर आत्ता सुनावणीस सुरुवात झाली आहे. त्याच्याविरोधात खून, जिवे मारण्याची धमकी, शस्त्र अधिनियम, मुंबई पोलिस अधिनियम यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होय, यानेच आमच्यासमोर मैत्रिणीचा गळा चिरला; न्यायालयातील साक्षीदरम्यान फिर्यादीने आरोपीला ओळखले
By नितीश गोवंडे | Updated: December 7, 2024 14:19 IST