यशवंत साखर कारखान्याचे धुराडे पेटेना!
By Admin | Updated: August 14, 2015 03:17 IST2015-08-14T03:17:44+5:302015-08-14T03:17:44+5:30
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीनविक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली आहे. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे़

यशवंत साखर कारखान्याचे धुराडे पेटेना!
लोणी काळभोर : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीनविक्री प्रक्रिया ग्राहक मिळत नसल्याने खोळबंली आहे. त्यामुळे हा विषय दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालला आहे़ एकीकडे यशवंतचे धुराडे पेटण्याचे नाव घेत नसून, दुसरीकडे उसाला कोणीही विचारेनासे झाल्याने शेतकरी सभासद व कामगारांचा जीव टांगणीला लागला आहे़
यशवंतच्या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीचालक व गुऱ्हाळचालक टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत असून, बाजारभाव व ऊसबिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतकऱ्यांना कुट्टी व गुऱ्हाळ मालकांची मनधरणी करावी लागत आहे़ या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला असून, ‘यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घ्या; परंतु कारखाना सुरू करून येथील शेतकऱ्यांचे संसार वाचवा,’ अशी भावना व्यक्त होत आहे.
कारखान्याच्या मालकीच्या ११३़१८ एकर जमिनीची विक्री करून बँकेची देणी भागवून उर्वरित रकमेतून कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु जमीनविक्री प्रक्रियेत कुठं घोडं अडतंय, हे न सुटणारे कोडे असून राजकीय पटलावर काही हालचाली होऊन खोडा निर्माण झाल्यामुळे ‘म्हाडा’च्या फायलीपासून रोडावलेल्या विक्रीप्रक्रियेचे गाडे पुढे न सरकल्याने यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, हे कोणालाही समजेनासे झाले आहे. सुमारे २०हजार सभासद व एक हजार कामगारांच्या कुटुंबांच्या चुलीशी निगडित असलेला साखर कारखाना अडचणीत असून, अखेरच्या घटका मोजत आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकप्रतिनिधींना याचे सोयरसुतक राहिले नसून, काही वर्षांपासून फक्त यशवंतचा राजकीय सोयीनुसार तालुक्यातील व जिल्ह्यातील पुढारी वापर करीत आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकयांची झोळी अजून रिकामी असून, फक्त खोट्या आश्वासनावर त्यांची बोळवण करण्यात येत आहे. प्रतिएकर दोन कोटी रुपये हा जाहीर केलेला दर राज्य बॅँक संचालक मंडळाच्या बैठकीत कमी करून पुन्हा नव्याने टेंडर मागविणार असल्याचे राज्य बॅँकेकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)