चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 21:54 IST2021-12-23T21:51:57+5:302021-12-23T21:54:49+5:30
महाराष्ट्रात पहिले ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. परदेशातून आलेल्या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती.

चिंतेत भर! औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचे आणखी 7 नवे रुग्ण, एका लहान मुलाचाही समावेश
पिंपरी - औद्योगिकनगरीत ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव होत असून पंधरवड्यात एकूण १९ रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात सात जणांचे अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिलासादायक गोष्ट म्हणजे, दहा जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. यात चार पुरूष आणि दोन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे.
महाराष्ट्रात पहिले ओमायक्रॉनचे रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळले. परदेशातून आलेल्या तिघांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. त्यानंतर परदेशातून आलेले इतर नागरिक आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांची तपासणी मोहीम महापालिका प्रशासनाने राबविली. त्यात आजपर्यंत एकोणीस रुग्ण सापडले आहेत. तर गुरूवारी सात जण नवीन रुग्ण आढळल्याचा अहवालप्राप्त झाला आहे. त्यात चार पुरूष, दोन महिला आणि एक लहान मुलीचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण भोसरी रुग्णालयात तर तीन जण एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत.
परदेशातून आलेल्या एकूण दहा नागरिकांना ओमायक्रॉन झाला असून त्यांच्या संपर्कातील नऊ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ‘‘पंधरवड्यात एकूण १९ रुग्ण सापडले आहेत. त्यांपैकी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रुग्णालयात दाखल असणाऱ्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.’’