कार्यकर्त्यांनीच केले वाहतूक नियोजन
By Admin | Updated: February 5, 2017 03:46 IST2017-02-05T03:46:24+5:302017-02-05T03:46:24+5:30
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी क्षेत्रीय कार्यालयांबाहेर प्रचंड गर्दी झाली. पोलीसांचे नियोजन नसल्याने शेवटी कार्यकर्त्यांनाच वाहतुकीचे नियोजन करावे लागले. गर्दी होणार,

कार्यकर्त्यांनीच केले वाहतूक नियोजन
पुणे : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी क्षेत्रीय कार्यालयांबाहेर प्रचंड गर्दी झाली. पोलीसांचे नियोजन नसल्याने शेवटी कार्यकर्त्यांनाच वाहतुकीचे नियोजन करावे लागले. गर्दी होणार, हे लक्षात घेऊन वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी शुक्रवारी नियुक्त करण्यात आले होते़ घोले रोड कार्यालयाबाहेर शनिवारी सकाळपासून एकही वाहतूक पोलीस फिरकला नाही़ त्यामुळे सकाळी अर्ज छाननीसाठी आलेले उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आपली वाहने थेट कार्यालयात घुसविली़ त्यामुळे आत जाण्यास जागाही उरली नाही़
रेश्मा भोसले व सतीश बहिरट यांच्या अर्जावर निर्णय देताना कोणताही वाद होऊ नये, म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून जलदकृती दलाची गाडी तेथे आली, तेव्हा पोलिसांनी वाहनांना वाट करून देण्यास सुरुवात केली़
हिच परिस्थिती सर्व१४ क्षेत्रीय कार्यालयांबाहेर होती. क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते थांबत होते.
अनेक दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याच शहर पातळीवरील वरिष्ठ नेते सातत्याने क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देत होते. त्यामुळे वाहनांचे ताफेच्या ताफे या ठिकाणी येत होते.
प्रामुख्याने टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय, कसबा क्षेत्रीय कार्यालय या जादा वाहतूक असलेल्या ठिकाणी गर्दी जास्त होती. त्याचा परिणाम परिसरात वाहतूक कोंडी होण्यावर झाला होता.
छाननीला वेळ लागल्याने वाहनांच्या रांगा
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाबाहेर दोन्ही बाजूला पार्किंग केले गेल्याने सकाळपासून वारंवार वाहतूककोंडी होत होती़ छाननीला वेळ लागत असल्याने असंख्य कार्यकर्ते कंटाळले होते़ त्यात बाहेर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती़ त्यामुळे काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियोजन सुरू केले़ वाहतूककोंडी दूर केल्यानंतर ते पुन्हा परत जात होते़ काही वेळाने पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होत होती़