कोरोना काळातील परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:09+5:302021-05-15T04:10:09+5:30
यवत : कोरोना आजाराच्या वैश्विक संकटाच्या काळात देखील खंबीरपणे रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचा करावा तेवढा सन्मान कमी पडेल. कोरोनाच्या आणीबाणीच्या ...

कोरोना काळातील परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद
यवत : कोरोना आजाराच्या वैश्विक संकटाच्या काळात देखील खंबीरपणे रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचा करावा तेवढा सन्मान कमी पडेल. कोरोनाच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देखील जीवाची बाजी लावणाऱ्या परिचारिकांचे कार्य गौरवास्पद असल्याचे मत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी केले.
राष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यवत ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिका व आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड, यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर डॉ. चेतन तुमाले व परिचारिका उपस्थित होत्या.
वैशाली नागवडे यांनी परिचारिकांचा विशेष अभिनंदन केले. मागील काही दिवसात ५० पेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व इतर ३० अशा ८० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परिचारिकांनी यात मोलाची भूमिका बजावली असून यापुढे देखील देशाच्या संकटाच्या काळात ठामपणे उभे रहा, असे आवाहन यावेळी नागवडे यांनी केले.
दौंड तालुक्यात लसीचा कोठा आल्यानंतर आठ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोठा दिला जातो. मात्र हे वाटप होताना मोठी लोकसंख्या असलेली यवत व दौंड यांना लोकसंख्येच्या मनाने कमी लस उपलब्ध होते. यवत येथे ग्रामीण रुग्णालय आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र खामगाव येथे आहे. यामुळे खामगावमधील आरोग्य केंद्रात तेथील स्थानिकांना प्राधान्य मिळते. तालुक्यातील आठ प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन ग्रामीण रुग्णालय असे दहा भाग करून लस वाटप करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व वैशाली नागवडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार व तालुका आरोग्य अधिकारी पोळ यांच्याकडे केली.
१४यवत
परिचारिकांचा सत्कार करताना वैशाली नागवडे, गणेश कदम व इतर.