महिलांनी पंतप्रधानांना पाठवले गोवऱ्यांचे ‘पार्सल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST2021-09-05T04:15:35+5:302021-09-05T04:15:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : केंद्र सरकारने शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आणली असल्याची टीका करीत ...

महिलांनी पंतप्रधानांना पाठवले गोवऱ्यांचे ‘पार्सल’
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : केंद्र सरकारने शेणाच्या गोवऱ्यांवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आणली असल्याची टीका करीत बारामती येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडीने पंतप्रधानांना पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या आहेत.
बारामतीत शनिवारी (दि.४) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. गॅस दरवाढीचा भडका उडाल्याने आता चुलीवर स्वयंपाकाची वेळ आली आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये झालेल्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आंदोलन करण्यात आले. महिलांनी थेट पंतप्रधानांना पोस्टाने गोवऱ्या पाठवत दरवाढीचा निषेध व्यक्त केला. यापूर्वी देखील लॉकडाऊनमुळे वैतागलेल्या एका बारामतीकर चहावाल्याने पंतप्रधानांना दाढी करण्यासाठी १०० रुपयांची मनीआॅर्डर पाठवली होती. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानांना गोवऱ्यांचे पार्सल पाठवत गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा संताप व्यक्त केला आहे.
एकीकडे सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मेटाकूटीला आला आहे. केंद्र सरकार या भाववाढीवर कोणतेही नियंत्रण आणत नसल्याची तक्रार करीत यावेळी दरवाढीबाबत केंद्राचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वनिता बनकर, युवती अध्यक्षा आरती शेंडगे, संगीता पाटोळे, भाग्यश्री धायगुडे, दीपाली पवार, कविता वाघमारे, रेश्मा शेंडगे, आयशा शेख आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
छायाचित्र : बारामती महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गॅस दरवाढीमुळे पंतप्रधानांना पोस्टाद्वारे शेणाच्या गोव-या पोस्टाद्वारे पाठवण्यात आल्या.
०४०९२०२१ बारामती—०१७
बातमी फोटोसह आवश्यक