woman stole Rs 1 crore 74 lakh from house with the help of a friend | मित्राच्या मदतीने महिलेने घरातूनच चोरले १ कोटी ७४ लाख रुपये

मित्राच्या मदतीने महिलेने घरातूनच चोरले १ कोटी ७४ लाख रुपये

पुणे : व्यावसायिकाच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा १ कोटी ७४ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज घरातील नातेवाईक महिलेनेच मित्राच्या मदतीने चोरल्याचे उघडकीस आले आहे. बिबवेवाडी पोलिसांनी या महिलेला अटक केली असून तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अक्षय भंडारी (वय ३३, रा. गायत्री अपार्टमेंट, बिबबेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, भंडारी यांचा चाकण येथे मसाल्याचा व्यवसाय आहे. कोरोना संसर्गामुळे बँका बंद असल्याने त्यांनी व्यवसायातून आलेली रक्कम घरातील कपाटात ठेवली होती. त्यात १ कोटी रुपये रोकड तसेच इतर वेळी वेळोवेळी आलेली रोकड व दागिने तिजोरीत ठेवले होते. ३ जून रोजी त्यांच्या पत्नीने तिजोरी उघडली. तेव्हा त्यातील रोकड व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. घरात इतर कोणत्याही वस्तूला हात लावण्यात आला नसल्याने ही चोरी घरातीलच कोणीतरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी घरातील महिलेकडे चौकशी केल्यावर ती काहीतरी लपवित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या पत्नीने तिच्याकडे चौकशी केल्यावर तिने
वेळोवेळी घरातील पैसे व दागिने चोरी करुन तिचा मित्र अनिकेत सुरेंद्र बुबणे याला दिल्याचे सांगितले. त्यांनी चर्चा करुन आपसात मिटविता येईल या
हेतूने या महिलेच्या मदतीने अनिकेत याचे मित्र व नातेवाईक यांच्याकडे अनिकेतचा शोध घेतला. परंतु चोरी केल्यानंतर तो मोबाईल बंद करुन घरातून
पळून गेला आहे. त्यामुळे शेवटी भंडारी यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे धाव घेतली. याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी
घटनास्थळी जाऊन पहाणी केली. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. अनिकेत बुबणे याचा पोलीस शोध घेत आहेत.

अशी केली घरातच चोरी
भंडारी व त्यांचे कुटुंबिय ३१ मे रोजी कोथरुडला त्यांच्या एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी या महिलेने त्यांच्याबरोबर जाताना घराच्या व कपाटाच्या चाव्या घराबाहेर असलेल्या शु रॅकमध्ये ठेवल्या. तसे अनिकेत याला सांगितले. त्याचवेळी तिने सी सी टी व्ही कॅमेरे बंद करुन कॅमेर्‍यांची दिशा बदलली. जेणे करुन कोण घरात येऊन गेले, हे समजू नये. सर्व जण कोथरुडला गेल्यावर अनिकेत घरी आला. त्याने ठरल्याप्रमाणे शु रॅकमधील चाव्या घेऊन घर उघडून आत प्रवेश केला. कपाटातील तिजोरी उघडून त्यात ठेवलेली १ कोटी रुपये असलेली बॅग तसेच सोन्याच्या बांगड्या, सोन्याची नाणी, सोन्याची चीप, कानातील डुल, डायमंड सेट, गळ्यातील व कानातील सोन्याचे २ सेट असा सर्व ऐवज चोरला व तो फरार झाला. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

याअगोदरही केली होती चोरी
यापूर्वी ऑक्टोंबर २०१९ मध्ये ५० लाख रुपये, जून २०१९ मध्ये ३ लाख रुपये तिजोरीतून चोरले होते. ही चोरी पचल्याने तिने मित्राच्या मदतीने इतका
मोठा डल्ला मारण्याचा कट रचला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: woman stole Rs 1 crore 74 lakh from house with the help of a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.