नवले पुलावरून उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलीस, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2023 22:24 IST2023-02-19T22:22:53+5:302023-02-19T22:24:37+5:30
प्रेमप्रकरणातून तिने उडी मारल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

नवले पुलावरून उडी मारुन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलीस, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
कल्याणराव आवताडे, धायरी: नवले पुलावरून २४ वर्षाच्या एका महिलेने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले असून त्या महिलेवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रेमप्रकरणातून तिने उडी मारल्याच्या प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नवले पुलावरून जोर - जोरात ओरडत होती. ती खाली उडी मारण्याच्या तयारीत असताना नवले पुलाखाली वाहतूक नियमन करीत असलेले वाहतूक पोलीस अंमलदार मिथुन राठोड, अमर कोरडे व स्थानिक नागरिक राजू जगताप, सागर बर्दापूरे, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे व इतर जणांनी तत्काळ पुलाखाली सतरंजी पकडली. काहीजण त्या महिलेला वाचविण्यासाठी पुलावर जाण्याच्या दिशेने निघाले. तोपर्यंत त्या महिलेने पुलावरून खाली उडी मारली. मात्र वाहतूक पोलीस व स्थानिकांनी सतरंजी व हाताच्या सहाय्याने पकडल्याने तिचे प्राण वाचले.यामध्ये सदर महिला किरकोळ जखमी झाली असून जवळच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.
५० फूट उंचीवरून मारली उडी; जीवाची बाजी लावून वाचवले प्राण...
नवले पुलाची उंची साधारणता ५० फूट इतकी आहे. ज्यावेळी महिला पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तिथे असलेल्या वाहतूक पोलिसांना व स्थानिकांना नेमके काय करावे हेच समजेना. एकाने हॉटेलमधून तत्काळ सतरंजी आणली. पोलिसांनी व स्थानिकांनी सतरंजीसह एकमेकाना हात पकडुन पुलाखाली थांबले. क्षणार्धात त्या महिलेने पुलावरून उडी मारली. मात्र खाली स्थानिकांनी सतरंजी पकडल्याने तिचे प्राण वाचले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"