Pune Crime: ऑनलाईन खरेदी करून रिव्ह्यू द्यायला सांगून महिलेची ३ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: August 16, 2023 16:47 IST2023-08-16T16:47:23+5:302023-08-16T16:47:54+5:30
याप्रकरणी गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे...

Pune Crime: ऑनलाईन खरेदी करून रिव्ह्यू द्यायला सांगून महिलेची ३ लाखांची फसवणूक
पुणे : प्रॉडक्ट खरेदी करून त्यावर रिव्ह्यू दिल्यास चांगले कमिशन मिळेल असे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवार पेठेत राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, हा प्रकार १ जुन २०२३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे. महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन आला, प्रॉडक्ट खरेदी करून रिव्ह्यू दिल्यास मर्चंट कडून कमिशन मिळेल असे सांगितले. महिलेने होकार दिल्यानंतर दिवसाला ३० प्रॉडक्टला रिव्ह्यू देण्याचे काम आहे असे सांगून महिलेला त्याबाबत ट्रेनींगही दिली. त्यानंतर व्हाट्सअप ग्रुपमध्ये ऍड करून बायनान्स क्रिप्टोचे अकाउंट बनवण्यास सांगितले.
सुरुवातीला काही प्रमाणात मोबदला देऊन महिलेचा विश्वास संपादन केला. मिळालेला नफा बनावट वेबसाईटद्वारे दाखवून तो विड्रॉल कसा करायचा? याबाबत विचारणा केली असता वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून २ लाख ९३ हजार रुपये उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.