वर्कआॅर्डर नसताना मेट्रो भूमिपूजन कसे?
By Admin | Updated: January 3, 2017 06:22 IST2017-01-03T06:22:00+5:302017-01-03T06:22:00+5:30
मुंबईतील शिवस्मारकाचे काम सुमारे तीन हजार कोटींचे आहे. मात्र, अंदाजपत्रकात एक रुपयाचीही तरतूद नाही. पुणे मेट्रोचीही निविदा नाही, की वर्कआॅर्डर नाही.

वर्कआॅर्डर नसताना मेट्रो भूमिपूजन कसे?
पिंपरी : मुंबईतील शिवस्मारकाचे काम सुमारे तीन हजार कोटींचे आहे. मात्र, अंदाजपत्रकात एक रुपयाचीही तरतूद नाही. पुणे मेट्रोचीही निविदा नाही, की वर्कआॅर्डर नाही. असे असताना या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन कसे काय करण्यात आले, असा सवाल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी घेण्यात आल्या. त्यानंतर पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतली. पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, श्यामला सोनवणे, शिक्षण मंडळाचे उपसभापती विष्णू नेवाळे, सरचिटणीस सजी वर्की, माजी नगरसेविका निगार बारसकर आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेले भूमिपूजन नियमबाह्य आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन आणि उद्घाटनाची सत्ताधाऱ्यांकडून घाई सुरू आहे. मोदींनी ३१ डिसेंबरला जाहीर केलेल्या योजना म्हणजे मिनी अर्थसंकल्पच आहे. त्यांच्याकडे नोटाबंदीवर बोलण्यासाठी विषय नव्हता, म्हणून त्यांनी या योजनांचा आधार घेतला. मात्र, त्यासुद्धा नियमाला धरून नव्हत्या.
भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त पिंपरी-चिंचवड करण्यावर काँग्रेसचा भर राहणार असल्याचे पाटील म्हणाले. केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकार असल्याचा फायदा उठवून राष्ट्रवादीने महापालिकेतील सत्ता मिळविली. मात्र, महापालिकेतील भ्रष्ट कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
(प्रतिनिधी)