अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एका मोठ्या गटाने बंड केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार सत्तेत सामील झाले. तेव्हापासून सातत्याने एक चर्चा होते ती म्हणजे काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? याच दिशेने सध्या दोन्ही पक्षांची पावले पडताना दिसत आहे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशातही एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली. याच मुद्द्यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.
एका मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, "माझी जास्त चर्चा अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्याशीच झाली आहे. ते कदाचित त्यांच्या वरिष्ठांशी (शरद पवार) किंवा कोअर कमिटीसोबत चर्चा करत असतील."
सुरुवातीला अपयश आले, पण पुन्हा प्रयत्न केला
"आधी थोड्या जागांवर मागे-पुढे झाले. ज्या जागा तुतारीला हव्या होत्या. त्याच जागा घड्याळालाही हव्या होत्या. शेवटी तुम्ही कुणाबरोबर युती-आघाडी करता, तेव्हा दोन पावले मागे. दोन पावले पुढे सरकावं लागतं. आधी अपयश आलं, पण नंतर पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा थोडंफार यश आलं", असे अजित पवार पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही पक्षाच्या आघाडीबद्दल बोलताना म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "अजून तो विचार आम्ही केलेला नाही. सध्या निवडणुकीची धामधूम आहे. आम्हाला रोज निवडणुकीचं मोठं काम करावं लागत आहे. आधी उमेदवार निवड, मग छाननी, मग काहींचे अर्ज माघारी वगैरे गोष्टी घडल्या."
"आम्ही याबाबतीत सध्या विचार केलेला नाही. पण, साधारणतः खालचे कार्यकर्ते समाधानी आहेत, एवढं मात्र पाहायला मिळालं आहे. राजकीय जीवनात काम करत असताना माझं एवढंच सांगणं आहे की, राजकारणात कुणी कुणाचं कायम शत्रू नसतो. कुणी कुणाचं कायम मित्र नसतो. यावरून काय ओळखायचं ते ओळखा", असे सांगत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे विधान केले.