वन्यजीव होरपळताहेत!
By Admin | Updated: January 14, 2015 03:13 IST2015-01-14T03:13:30+5:302015-01-14T03:13:30+5:30
जाळपट्टे काढण्यासाठी या वर्षीही वनविभागाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने मावळ, मुळशी, खेड तालुक्यांतील काही भागातील वनक्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडू लागले आहे.

वन्यजीव होरपळताहेत!
अंकुश जगताप, पिंपरी
जाळपट्टे काढण्यासाठी या वर्षीही वनविभागाकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने मावळ, मुळशी, खेड तालुक्यांतील काही भागातील वनक्षेत्र वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडू लागले आहे. उशिरा निधी मंजूर करून खर्चाचे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पिंपरी - चिंचवड शहरालगत असणाऱ्या मावळ, तसेच मुळशी तालुक्यांत निसर्गसंपन्न असे निमसदाहरित प्रकारातील वनक्षेत्र आहे. मावळ वनपरिक्षेत्राच्या अखत्यारित ११ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. मुळशीतील पौड वनपरिक्षेत्र ८ हजार २५९.४५ हेक्टरवर आहे. त्यामधील गवत आता वाळले आहे. शेती खरेदी करणारे बाहेरचे शेतकरी तसेच, व्यावसायिक हे जमीन सपाटीकरणासाठी जागेतील गवत व झाडोरा पेटवून देतात. या आगीमुळे लगतच्या वनक्षेत्रात वणवे लागत आहेत.
भातखाचरांमध्ये बियाणे पेरणीसाठीच्या जागेची माती भाजण्याचे (राब लावणे) प्रकार शेतकरी करतात. काहीजण वरई, नाचणीची बांधावर, डोंगर उतारावर लागवड करण्यासाठी झुडपे तोडून गवत पेटवून देतात. यासह वनक्षेत्रात भटकंतीसाठी जाणारे अनेक पर्यटक जेवणावळीसाठी चूल पेटवितात. बहुतेक वनक्षेत्रातून रस्ता तसेच, रेल्वेमार्गाने जाणारे प्रवासी गाडी थांबल्यावर सिगारेट पेटविण्यासाठी वापरलेली पेटती काडी वनक्षेत्रात टाकतात. परिणामी वणवे भडकत आहेत. मावळच्या पश्चिम भागात, मुळशी, खेड व लगतच्या भागात वणवे लागत आहेत.
जाळपट्टे काढल्यास वणव्याची आग नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी वनविभागाकडून निधी मंजूर होतो. हा निधी डिसेंबरपर्यंत वनपरिक्षेत्रांपर्यंत उपलब्ध झाल्यावर वनकर्मचारी तसेच, मजुरांकरवी जाळपट्टे काढले जायचे. मात्र रोजंदारीचा दर कमी असल्याने मजूर मिळणे कठीण झाले.