शिक्षकांचाच पगार उशिरा का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:36+5:302021-05-15T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासन अधिनियमानुसार १ ते ५ या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत पगार होणे अपेक्षित असताना ...

शिक्षकांचाच पगार उशिरा का ?
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शासन अधिनियमानुसार १ ते ५ या महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांत पगार होणे अपेक्षित असताना कधी महिना तर, कधी दुसऱ्या महिन्याची वाट शिक्षकांना पाहावी लागत आहे. ज्ञानार्जनाचे काम असो अथवा शासकीय सर्वेक्षण असो, त्यात शिक्षकांना हमखास कामावर लावले जाते. मात्र, असे असूनही पगाराची मात्र त्यांना वाट पाहावी लागते.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७४१ शाळा आहेत. त्यात जवळपास ११ हजार ४४२ शिक्षक ज्ञानार्जनाचे कार्य करत आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. असे असले तरी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू आहे. या सोबतच कोराेना सर्वेक्षणाची जबाबदारी ही शिक्षकांना देण्यात आली आहे. ही सर्व कामे जिल्ह्यातील शिक्षक चोखपणे बजावत आहेत. मात्र, पगाराच्या बाबतीत मात्र, दरमहिन्याला वाट बघावी लागत असते. राज्यशासनाच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार हे महिन्याच्या सुरुवातीला होत असतात. मात्र, शिक्षकांचा पगार हा नेमही महिन्याच्या शेवटी होत असतो. मार्च महिन्याचा पगार हा शिक्षकांना एप्रिलच्या शेटवच्या आठवड्यात मिळाला. आणि एप्रिल महिन्याचा पगार मे महिन्याच्या सुरुवातीलाच मिळणे अपेक्षित असतांना अद्यापही तो झालेला नाही. प्रत्येक महिन्याला हीच परिस्थिती असते. शासानाच्या इतर विभागांचे पगार जर वेळेत होत असतील तर शिक्षकांचे पगार नेहमी का उशिरा होतात, असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. आम्ही शासनाच्या सर्व कामात हिरिरीने पुढाकार घेतो. शिकवण्यासोबतच जनगणना तसेच इतर सर्वेक्षण आम्ही करत असतो. कामात कधीही कसूर केला जात नाही. अशा स्थितीत दर महिन्याचा पगार हा वेळेत व्हावा, अशी अपेक्षा काही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
चौकट
एकूण शाळा - ३७४१
पगार होणाऱ्या शाळा - ३६३१
एकूण शिक्षक ११४४२
कोट
शिक्षकांचे पगार उशिरा झाले की त्यांचे आर्थिक नुकसान होते. पगार रखडल्याने विमा, गृहकर्ज, कॅश क्रेडिट व इतर माध्यमातून घेतलेल्या कर्जाचे व्याज उशिरा भरल्याने आर्थिक नुकसान होते. शिक्षकांचे पगार भारतीय सैन्य दलाच्या नियमाप्रमाणे नियमित झाल्यास शिक्षक वर्गाला दिलासा मिळेल.
- अविनाश चव्हाण, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक समिती
कोट
शिक्षकांचे पगार दरमहा १ तारखेला करणार आशा प्रकारचे आदेश झालेले आहेत; परंतु कधीच पगार १ तारखेला पगार झाले नाही. शिक्षकांनी विविध बँकेकडून घेतलेली घरासाठी कर्ज, एलआयसीचे हफ्ते पगार वेळेवर न झाल्यामुळे वेळेवर भरता येत नाही. परिणामी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. दरमहा पगार २० ते २५ तारखेनंतर होत आहे. त्यामुळे शिक्षकांची गैरसोय होत आहे.
- शांताराम नेहेरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा
कोट
गेले वर्षभर प्राथमिक शिक्षकांचे पगार कधीच वेळेवर होत नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही बाब अध्यक्ष या नात्याने दोनदा सांगितली आहे. शिक्षकांच्या दैनंदिन गरजा, आजारपण यासाठी आर्थिक गरज असते. नेमके पगार उशिरा झाल्याने त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. शिक्षक सातत्याने राष्ट्रहितासाठी, चांगल्या कार्यात सहभाग घेत असतात. त्यांना पगार उशिरा देऊन मनस्ताप देऊ नये.
- आप्पासाहेब मुजुमले, अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट)
कोट
गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून येणारी ग्रॅंट ही वेळेवर येत नसल्याने पगार उशिरा होत आहे. एप्रिल महिन्याची ग्रॅंट ही येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. सर्व बिले तयार करण्यात आले असून त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही घेतली आहे. ग्रॅंट येताच पगार केले जातील.
- सुनील कुऱ्हाडे, जिल्हा शिक्षणाधिकारी