Pune: तीन दिवस पाणी मिळेना, हीच का स्मार्ट सिटी? टँकरसाठी द्यावे लागतात ३ ते ४ हजार
By श्रीकिशन काळे | Updated: June 17, 2023 16:15 IST2023-06-17T16:15:05+5:302023-06-17T16:15:28+5:30
शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले...

Pune: तीन दिवस पाणी मिळेना, हीच का स्मार्ट सिटी? टँकरसाठी द्यावे लागतात ३ ते ४ हजार
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील लाखो नागरिकांना महापालिकेच्या वतीने पाणी मिळत नाही. त्यामुळे ते हैराण झाले असून, टँकरचे पाणी ३ ते ४ हजार रूपयांना घ्यावे लागत आहे. पाणी हा मुलभूत अधिकार असताना तो देखील पुणे महापालिका देऊ शकत नाही आणि दुसरीकडे स्मार्ट सिटीतंर्गत जागतिक स्तरावर पुरस्कार घेऊन मिरवते, असा विरोधाभास पुण्यात दिसून येत आहेत. पाणी न आल्याने जवळपास ५ लाख लोकं संतापले. त्यानंतर शनिवारी सकाळी रास्ता रोको करण्यासाठी नागरिक रस्त्यावर आले.
भामा आसखेड प्रकल्पाच्या पाणीपुरवठ्याची वाहिनीला मोठी गळती झाल्यामुळे मागील तीन दिवसांपासून विमाननगर परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला. दर गुरुवारी शहरात महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्यातच गळतीची ही गंभीर समस्या उद्भवल्यामुळे भामा आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विमाननगर परिसरातील सर्व भागाला पाणी मिळालेले नाही. तीन दिवसांपासून पाण्याविना नागरिक हैराण झाले आहेत. खासगी टँकरवाले देखील हजारो रूपये मागत आहेत. एवढे पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सलग तीन दिवस पाणी बंद असल्याने नागरिक अतिशय वैतागले आहेत. दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.
महापौर, नगरसेवक नसल्याने विचारायचे कोणाला?
तीन दिवस पाणी पुरवठा नसल्यामुळे महापालिकेच्या वतीने पर्यायी उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे किमान टँकरद्वारे पाणीपुरवठा करता आली असती. पण त्याविषयी कोणाला विचारायचे हा प्रश्न नागरिकांना पडला. कारण स्थानिक नगरसेवक किंवा महापौर देखील सध्या कार्यरत नाहीत. केवळ महापालिका आयुक्त आहेत. त्यांच्यापर्यंत कोण जाणार ? असाही प्रश्न उपस्थित झाला.
पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर
तीन दिवसांपासून पाणी न मिळाल्यामुळे शनिवारी विमाननगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथील सोसायटीमधील नागरिक सीसीडी चौकात आली. तिथे त्यांनी रस्ता रोको केला. तेव्हा पाणीपुरवठाचे अधिकारी आले होते, त्यांना घेराव घातला. या वेळी पोलीस देखील हजर होते. पोलीसांनी दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर नागरिकांना त्यांनी समजावले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. पालिका अधिकाऱ्यांनी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले.
आम्ही तीन दिवस झाले पाण्याविना त्रस्त आहोत. कुठेतरी पाइपलाइन फुटल्याने पाणी बंद असल्याचे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. पण उपाययोजना मात्र काहीच केल्या नाहीत. पाणी हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार असतो. तो दिलाच पाहिजे. पालिकेने पाइपलाइन दुरूस्ती होत असेल तर इतर ठिकाणाहून सोय करायला हवी होती. खासगी टँकरवाले तीन-चार हजार रूपये मागत होते. आता पालिका आयुक्त व पालकमंत्र्यांना सर्व नागरिकांच्या वतीने पत्र पाठविले आहे.
- कर्नल शशिकांत दळवी (निवृत्त), विमाननगर रहिवासी