महिलांच्या प्रश्नांची दखल घेणार कोण?
By Admin | Updated: July 18, 2014 03:36 IST2014-07-18T03:36:50+5:302014-07-18T03:36:50+5:30
प्रभागात महिला स्वच्छतागृहाचा अभाव, असे विविध प्रश्न ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांत मांडण्यात आले

महिलांच्या प्रश्नांची दखल घेणार कोण?
नेहरूनगर : सोनसाखळी चोरी, मोकाट कुत्र्यांचा त्रास, भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात, प्रभागात महिला स्वच्छतागृहाचा अभाव, असे विविध प्रश्न ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांत मांडण्यात आले. ‘महिलांच्या प्रश्नांची दखल घेणार कोण?’ असा प्रश्नही महिलांनी व्यक्त केला. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून महिला, ज्येष्ठ नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक व पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पिंपरीतील मासूळकर कॉलनी प्रभाग २८ मध्ये नागरी समस्या जाणून घेतल्या. सोनसाखळी चोरी, मोकाट जनावरांचा त्रास, भटक्या जनावरांमुळे होणारे अपघात याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.
नागरिक वसंत भ्रदी म्हणाले, ‘‘मनीष गार्डन व अंतरिक्ष सोसायटीच्या भागातून पीएमपी बस सुरू कराव्यात. त्यामुळ या भागात रहदारी वाढेल. चेनस्कॅचिंगच्या घटनांना आळा बसेल.’’ के. एस. पवार म्हणाले, ‘‘सुखवानी पार्क ५ मधून जी सांडपाण्याची वाहिनी जाते. ती तुंबते. प्रत्येक महिन्याला साफ करण्यासाठी ८०० रुपये खर्च येतो. ती लाइन नाल्याला जोडली आहे. ही वाहिनी दुरुस्त करावी, तसेच सुखवानी पार्कच्या समोरील रस्त्यावर पावसाने पाणी साचते. ते वाहून जाण्याची व्यवस्था करावी.’’
‘मोकाट कुत्र्यांचा त्रास होता. कॉलनी प्रभागात स्वच्छतागृह उभारण्याची गरज आहे, असे विश्वनाथ परभणे म्हणाले. ‘झीरो बॉइज चौक, यशवंतनगर येथे महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. या भागात महिला व कामगार वर्गाची वर्दळ असते. स्वच्छतागृह गरजेचे आहे, अशी मागणी प्रदीप जगताप यांनी केली.
‘या भागात मोकाट कुत्र्याचा त्रास कधी थांबणार? तसेच डासांसाठी फवारणी करणे गरजेचे आहे, अशी मागणी अजमेरा हौसिंग सोसायटीतील सुभाष शिंदे यांनी केली. ‘कॉलनी प्रभागात मोकाट जनावरे फिरतात. त्यावर कारवाई व्हावी, असे माधवराव चौधरी म्हणाले. ‘भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पालिकेने कर्मचारी कर्मचाऱ्यांना अशा कुत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दिलीप पाळेकर यांनी केला. सुरेश दोडामणी म्हणाले, ‘‘ फ प्रभाग हा निगडीत आहे. तो संत तुकारामनगर पिंपरीत आणावा.’’ सुदाम शितोळे म्हणाले, ‘‘सोनसाखळी चोरांचा त्रास वाढत आहे. त्यासाठी पोलिसांची गस्त हवी आहे. ’’ ‘या भागात कुत्र्यांचा त्रास वाढत आहे. त्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बी. जी. बोरसे यांनी केली.
नगरसेवक समीर मासूळकर म्हणाले, ‘‘मोकाट जनावरांमुळे अपघात होतात, हे खरे आहे. मात्र, ही जनावरे का येतात याबाबतचे कारण समजून घ्यायला हवे. सोसायट्यांमधील काही लोक या जनावरांना अन्न देतात. त्यामुळे विशिष्ट वेळी ही जनावरे येतात. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली आहे. ’’
नगरसेविका मंदाकिनी ठाकरे म्हणाल्या, ‘‘महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्नाबाबत पाठपुरावा केला आहे. महापालिकेने नवीन आराखडा केला आहे. त्यात आमच्या भागाचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे.’’
मोकाट जनावरांचा प्रश्न पशवैैद्यकीय विभागाच्या अंतर्गत येतो. नागरिकांच्या भावना संंबंधित विभागापर्यंत कळवू, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच स्वच्छतागृहांचाही प्रश्न सोडविला जाईल, अशी माहिती स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.(वार्ताहर)