राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ ‘कैफ’चे निधन
By Admin | Updated: June 11, 2017 03:56 IST2017-06-11T03:56:49+5:302017-06-11T03:56:49+5:30
कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील मुख्य आकर्षण असलेला पांढरा वाघ कैफ याचे दीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी ४ वाजता निधन झाले़ मृत्युसमयी तो १४ वर्षांचा होता.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पांढरा वाघ ‘कैफ’चे निधन
- लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील मुख्य आकर्षण असलेला पांढरा वाघ कैफ याचे दीर्घ आजाराने शुक्रवारी दुपारी ४ वाजता निधन झाले़ मृत्युसमयी तो १४ वर्षांचा होता. त्याला दोन वर्षांपूर्वी औरगाबाद येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून आणले होते.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात २ वर्षांपूर्वी एप्रिल २०१५मध्ये कैफ व प्रियदर्शनी या पांढऱ्या नर-मादी वाघांचे आगमन झाले होते़ आगमनापासूनच कैफ हा प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र होते. मात्र, चार महिन्यांपासून तो अर्धांगवायूने आजारी होता़ त्यातच दोन महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली व त्याने अन्नपाणी सोडले होते़ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्राणिसंग्रहालयातील हॉस्पिटलमध्ये त्याला सलाईनवर ठेवण्यात आले होते; परंतु शुक्रवारी सायंकाळी त्याचे निधन झाले. त्याच्यावर दहन विधी पद्धतीने प्राणिसंग्रहालयात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले, की कैफवर क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय तज्ज्ञ प्राध्यापक, संग्रहालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी, अॅनिमल कीपर तसेच कर्मचारी सतत लक्ष ठेवून होते व त्याची खूप काळजी घेत. प्राणिसंग्रहालयातील कोणताही प्राणी वृद्धापकाळाशिवाय संसर्गजन्य रोगाने किंवा अन्य कोणत्याही कारणाने मरण पावत नाही़ देशपातळीवरील आकडेवारीनुसार ७-८ टक्के प्राण्यांचा मृत्यू होतो़ येथील प्राण्यांची आरोग्य सल्लागार समितीच्या वतीने वेळोवेळी तपासणी होत असून प्राण्यांच्या संख्येतील वाढ किंवा मृत्यूची माहिती केंद्रीय प्राणिसंग्रहालय विभागाला कळवली जातो.
सध्या प्राणिसंग्रहालयात प्रियदर्शनी नावाची एक १६-१७ वर्षांची वृद्ध वाघीण प्रेक्षकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे़ कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात कैफला पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक येत असत. कैफच्या जाण्याने सर्वांच्याच मनाला चटका लागला आहे.
- कैफ हा पांढरा वाघ वृद्धापकाळाकडे झुकलेला असला, तरी उंचापुरा,
अत्यंत धष्टपुष्ट व देखणा होता. काही महिन्यांपूर्वी
याच पांढऱ्या वाघाच्या खंदकामध्ये मनोरुग्ण असलेल्या एका तरुणाने उडी मारली होती; परंतु तरीदेखील वाघाचा धर्म न पाळता कोणतीही इजा त्याला कैफने पोहोचवली नव्हती.