When will the issue of parking in Family Court be resolved? | फँमिली कोर्टातील पार्किंगचा प्रश्न सुटणार कधी ?
फँमिली कोर्टातील पार्किंगचा प्रश्न सुटणार कधी ?

ठळक मुद्देफॅमिली कोर्टातील पार्किंगबाबत उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा सुरु

पुणे :  मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांपूर्वी कौटूंबिक न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन केले. राज्यातील पहिल्या कौटूंबिक न्यायालयाच्या इमारतीचे उदघाटन होऊन दोन वर्ष झाल्यानंतर देखील त्या इमारतीतील पार्किंगचा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. पक्षकारांची वाढत जाणारी संख्या त्यांनी वाहने लावण्याकरिता शिवाजीनगरच्या सत्र न्यायालयात केलेली गर्दी यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे फँमिली कोर्टात काम करणारे वकील देखील शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात वाहने पार्क करीत असल्याने शिवाजीनगर सत्र न्यायालयात देखील पार्किंगसाठी जागा शोधावी लागणार आहे. 
 मुंबई उच्च न्यायालयान्ने फँमिली कोर्टात पे अँण्ड पार्क सुरु करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र पुणे जिल्हयातील अन्य कुठल्याही न्यायालयात पे अँड पार्क स्वरुपात शुल्क आकारणी होत नाही. यामुळे वकीलांनी पार्किंगकरिता शुल्क देण्यास नकार दर्शवला. हा नकार पुढे उच्च न्यायालयाला देखील कळविण्यात आला. पुढे पुणे जिल्हा बार असोशिएशने भुयारी मार्ग आणि पार्किंग सुरु करण्याची मागणी केली. तेव्हा जानेवारी 2018 च्या दरम्यान भुूयारी मार्ग सुरु करण्यात आला होता. या भुयारी मार्गाचे उदघाटन तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्यांनी यावेळी पार्किंग सुरु करणार असल्याचे सांगितले. त्या घटनेला 20 महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर देखील पार्किंगचा प्रश्न प्रलंबितच असल्याचे दिसून आले आहे.
 याबाबत अधिक माहिती देताना पुणे बार असोशिएशनचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. शिरीष शिंदे म्हणाले,  फँमिली कोर्टातील पार्किंगचा प्रश्न खरे तर अनेक दिवसांपासून प्रलंवित आहे. या पार्किंगसंदर्भात उच्च न्यायालयाकडून सुचना आल्या असताना देखील तो प्रश्न सुटताना दिसत नाही. पे अँड पार्किंगपेक्षा खुल्या पध्दतीने पक्षकारांकरिता पार्किंगचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. मात्र फमिली कोर्टाकडून याबाबत टाळाटाळ केली जात आहे. मोठ्या संख्येने पक्षकार फँमिली कोर्टात येत असतात. त्यांना वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने ते जिल्हा न्यायालयाच्या आवारातच गाड्या लावत आहेत. फँमिली कोर्टात पुरेशी जागा असताना देखील त्याचा योग्य रीतीने उपयोग केला जात नाही.  

.....................................
  फॅमिली कोर्टातील पार्किंगबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरु आहे. पे अँण्ड पार्क सुरु करावे अशी उच्च  न्यायालयाची मागणी आहे. मात्र आम्ही निशुल्क पध्दतीने पार्किंग सुरु करावे अशी विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल. पार्किंग नसल्यामुळे पक्षकार, वकील यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ही वस्तुस्थिती आहे. दुसरीक डे मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहने लावण्याकरिता पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर गाड्या लावल्याने पोलीस कारवाई करतात. यासगळयात पार्किंगचा प्रश्न सुटण्याकरिता न्यायालयाशी बोलणी सुरु आहे. - अ‍ॅड वैशाली चांदणे ( अध्यक्ष,  पुणे फँमिली कोर्ट लॉयर्स असोशिएशन) 

.......................

  शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील पार्किंगवरील ताण आता फँमिली कोर्टातील पार्किंगच्या प्रश्नामुळे वाढला आहे. याकरिता तातडीने तेथील पार्किंग प्रश्न सुटणे गरजेचा आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. यापूर्वी अनेकदा यासंबंधी विचार झालेला आहे. मात्र कार्यवाही झालेली नाही. आता फँमिली कोर्ट यांनी पक्षकार, वकील यासर्वांची पार्किंगची समस्या लक्षात घेऊन तो प्रश्न लवकरात लवकर निकाली काढणे गरजेचे असून त्यामुळे मोठी अडचण दुर होणार आहे. - अ‍ॅड. श्रीकांत अगस्ते (अध्यक्ष, पुणे बार असोशिएशन) 

 

Web Title: When will the issue of parking in Family Court be resolved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.