ओतूर : यंदा गव्हाला अतिशय पोषक असे वातावरण लाभले आहे. १० ते १५ दिवसांत गहू मळणी कामाला वेग येणार आहे. यंदा शेतकऱ्यांना १८ ते २० क्विंटल एवढे एकरी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी श्रीराम, सरबती, सत्तर, सतर अंकुर केदार, अशा वेगवेगळ्या गव्हाच्या जातीची लागवड केली आहे.नोव्हेंबर महिन्यात ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची चांगली मशागत करून व ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करून बरोबर १५.१५.१५ हया खत घातले आहे. अशा शेतकऱ्यांचा यंदा गहू पीक अतिशय चांगले आहे. साधारणः २१ दिवस झाल्यावर तणनाशकाची फवारणी केली. त्यानंतर बरोबर दीड महिन्यानंतर डी.ए.पी. व १९:१९ ची फवारणी केली आहे, तसेच यासाठी प्रोफेक्स सुपर टाकले आहे.मावठा व इतर रोग येऊ नये म्हणून रोगारची फवारणी केली. आतापर्यंत पाण्याच्या पाच पाळ्या झाल्या आहेत. सध्या गव्हाची लोंबी जर पाहिली तर दमदार दाणे भरलेले पाहावयास मिळत आहेत. जवळपास लोंबीत ६० ते ७० त्यापेक्षा अधिक दाणे दिसत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा गहू काढणीला येईल, असा अंदाज आहे. यंदा गव्हाचे विक्रमी व चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ओतूर फापाळेशिवार येथील प्रगतिशील शेतकरी शरद अनंता फापाळे यांनी सांगितले.
पोषक वातावरणामुळे यंदा गव्हाचे पीक जोमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:34 IST