पुणे : चंदननगर परिसरातील पठारे मळा येथील श्री लॉजवर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये त्याला मागील काही महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होते. आकाश सुनील साबळे (२५, रा. चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
शुक्रवारी (दि. १४) आकाश हा रंग खेळल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याच्या मित्रासोबत साईनाथ नगर येथील श्री लॉजवर गेला होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. वारंवार त्याचे त्या लॉजवर दारू पिण्यासाठी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशीही त्याने एटीएममधून पैसे काढून भरपूर दारू प्यायली. यावेळी त्याच्या मित्रांनी त्याच्या खिशातील पैसे काढून त्याच्या घरी नेऊन दिले. तसेच त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे देखील सांगितले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मित्रांनी लॉजवर जाऊन आकाशला उठविण्याचा व आवाज देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो झोपला असेल म्हणून त्यांनी त्याला उठवले नाही. त्याला झोपू दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मित्र त्याला उठवायला गेले. त्याला जोराजोरात आवाज देऊनही तो न उठल्याने दरवाजा उघडून तपासणी केली असता तो मयत झाल्याचा संशय आला. यानंतर पोलिसांना कळवत आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याबाबत चौकशी करण्यात आली असता व त्याच्या घरच्यांना विचारणा केली असता त्यांचा त्याच्या मित्रांवर कोणताही संशय नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले. आमचा या प्रकरणात तपास सुरू असून, सीसीटीव्हीच्या आधारे व अन्य सर्व बाबी आम्ही पडताळून पाहत असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. याप्रकरणी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.