तृतीयपंथीयांचे फिनिक्स मॉलमध्ये स्वागत, मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 05:10 IST2018-03-21T05:10:22+5:302018-03-21T05:10:22+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले.

तृतीयपंथीयांचे फिनिक्स मॉलमध्ये स्वागत, मागितली माफी
पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी यांना फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याच्या निषेध म्हणून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने तृतीयपंथीयांचे औक्षण करून फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करून आंदोलन करण्यात आले. मॉल प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत सोनाली यांनीही मॉलमध्ये प्रवेश केला. मॉल प्रशासनाने त्यांचे स्वागत करत जाहीर.
सोनाली दळवी या त्यांच्या मित्रासोबत फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडव्यासाठी खरेदी करण्यासाठी गेल्या असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच माध्यमांमधून मॉल प्रशासनावर टीका करण्यात येत होती. या प्रकाराबाबत मॉल प्रशासनाने माध्यमांकडे दिलगिरी व्यक्त केली होती. मंगळवारी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथीयांसोबत फिनिक्स मॉलमध्ये प्रवेश करण्यात आला.
या वेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मॉलचे व्यवस्थापक आनंद भालेराव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत तृतीयपंथीयांचे स्वागत केले. या वेळी भगवान वैराट म्हणाले, की तृतीयपंथी व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा आणि लोकशाही राजवटीत
सर्वत्र संचार करण्याचा अधिकार
आहे. मात्र, फिनिक्स मार्केटसिटी मॉलच्या व्यवस्थापनाने
तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारून तिच्या माणूस म्हणून जगण्याच्या अधिकारावर आणलेले बंधन चुकीचे आहे.
समाजाने आम्हाला स्वीकारावे आणि प्रेम द्यावे इतकीच आमची माफक अपेक्षा आहे. मॉल प्रशासनाने जाहीर माफी मागितल्याने आमच्यासाठी हा विषय आता संपला आहे.
- सोनाली दळवी