साहित्यप्रेमींचे स्वागत
By Admin | Updated: January 15, 2016 04:10 IST2016-01-15T04:10:04+5:302016-01-15T04:10:04+5:30
साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या साहित्यप्रेमींना खास बसच्या माध्यमातून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ घडणार आहे. शहरातील प्रकल्पांची, तसेच वैशिष्ट्यांची

साहित्यप्रेमींचे स्वागत
पिंपरी : साहित्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत येणाऱ्या साहित्यप्रेमींना खास बसच्या माध्यमातून ‘पिंपरी-चिंचवड दर्शन’ घडणार आहे. शहरातील प्रकल्पांची, तसेच वैशिष्ट्यांची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेने या खास बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महापालिकेने राबविलेले प्रकल्प, तसेच शहरातील प्रेक्षणीय स्थळांसह विविध वैशिष्ट्ये पाहण्यासाठी परराज्यांतील आणि परदेशातील नागरिक आणि अधिकारी शहराला भेट देण्यासाठी येत असतात. शहरातील हीच वैशिष्ट्ये साहित्यिकांनाही पाहता यावीत यासाठी महापालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पिंपरीतील एचए मैदानावर शुक्रवारपासून साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. यासाठी राज्यासह देशभरातील साहित्यिकांचा मेळा येथे जमणार आहे. या साहित्यिकांना शहरातील वैशिष्ट्यांविषयी माहिती व्हावी. महापालिकेने राबविलेले प्रकल्प, प्रेक्षणीय स्थळे पाहता यावेत यासाठी महापालिकेकडून ही खास बससेवा सुरू करण्यात येणार आहे. संमेलनस्थळापासून ही बस सुटेल. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन टप्प्यांत ही बस असेल. शहराविषयीची माहिती सांगण्यासाठी या बसमध्ये महापालिकेचे दोन अधिकारी असतील. साहित्यिकांना प्रकल्पांविषयीची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ही सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहे. यासह संमेलनाच्या उद्घाटनावेळी, तसेच समारोपावेळी पिंपरी-चिंचवड शहराविषयीच्या माहितीची ‘एरियल शूटिंग’द्वारे चित्रित केलेली दहा मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी दोन दालनांमध्ये शहराविषयीची छायाचित्र रूपात माहिती देण्यात येणार आहे.
तसेच महापालिकेकडून संमेलनासाठी विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. पाण्याचा टँकर, अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी तैनात असतील. तसेच संमेलनस्थळावर जाण्याच्या सर्व मार्गांवर आणि परिसरात महापालिकेच्या वतीने विद्युत व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
संमेलनासाठी पालिकेकडून ३५ फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले आहेत. पालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या यंत्रणेत समन्वय राहावा, सुविधा पुरविण्यात कसलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मंडपात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यासह विविध कामकाजासाठी महापालिकेकडून मनुष्यबळही पुरविण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांनी दिली.
संमेलनात आयोजित बालआनंद मेळाव्यात महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
दहा हजार विद्यार्थी घेणार सहभाग
१ बालसाहित्याशी संबंधित असणारा बालगीते, बालकविता आणि नृत्यांवर आधारित ‘बालआनंद मेळावा’ हा मुलांचा आनंदोत्सव प्रथमच ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. सोमवारी (दि. १८) मुख्य मंडपातील या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील सुमारे दहा हजार विद्यार्थी निमंत्रित करण्यात आले असून, ते याचा आनंद घेतील.
२मुलांचा आनंदोत्सव असणाऱ्या बालआनंद मेळाव्याची मूळ संकल्पना स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांची आहे. एरवी साहित्य संमेलनात करमणुकीचे कार्यक्रम होतात; पण मुलांसाठी म्हणून हा पहिलाच सव्वादोन तासांचा विशेष कार्यक्रम होत आहे, असे बालआनंद मेळाव्यातील नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी सांगितले. या कार्यक्रमाची संहिता व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांचे आहे. यातील बालकविता आणि गीतांमध्ये विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके ते संदीप खरे अशा विविध पिढ्यांच्या कवींच्या रचना सादर करण्यात येतील.
३त्यात मुलांच्या भावविश्वाशी जोडली गेलेली बालगीत आणि त्यावर आधारित नृत्ये यातून मुलांची धमाल सफर घडवण्यात येईल, असे मोघे म्हणाल्या. यात ‘श्यामची आई’ या चित्रपटातले ‘छडी लागे छम छम...’, ‘तू सुखी रहा’ या सिनेमातील ‘मामाच्या गावाला जाऊ या...’ ते आजचे लोकप्रिय बालगीत अग्गोबाई ढग्गोबाई... अशी सुमारे १८ ते २० बालगीते सादर केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
४खोडकर चिंटूची व्यक्तिरेखा साकार करणारा शुभंकर अत्रे, त्याची मैत्रीण मिनी हिची भूमिका करणारी सुहानी धडफळे आणि कार्टूनसाठी व्हॉईसओव्हर देणारी मेघना एरंडे हे सूत्रसंचालन करणार आहेत. त्यात शुभंकर हा चिंटूचे बाबा, सुहानी मोठी मुलगी तर मेघना विविध छोट्या मुलीचे काम करताना विविध कार्टून पात्रांचे आवाज काढून धमाल उडवून देणार आहेत, असे मोघे यांनी सांगितले. कार्यक्रमाची नांदी अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या सादर करणार असून, संपूर्ण कार्यक्रमात एकंदर पाच नृत्ये सादर केली जाणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.