पुणे : काँग्रेसवाले आम्हाला जवळ करत नव्हते. त्यांना वाटायचे की, दगड उभा केला तरी तो निवडून आणू. काँग्रेसवाल्यांना मस्ती चढली होती. त्यांचे २ ते २ टक्के मतदार फिरवून काँग्रेस आणि शरद पवारांना हरवण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठीच आम्ही भाजपसोबत गेलो, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. आत्मविश्वास गमावलेल्या समाजाला पुन्हा फुंकर देण्यासाठी राजू शेट्टी, बच्चू कडू आणि मी एकत्रित काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गंज पेठेतील सावित्रीबाई फुले सभागृहात रविवारी आयोजित केलेल्या युवा संघर्ष निर्धार परिषदेत जानकर बोलत होते. यावेळी प्रहार संघटनेचे बच्चू कडू, अमर कदम, प्रकाश बालवडकर, काशीनाथ शेवते, कुमार सुशील, अजित पाटील, सुधाकर जाधवर, शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
जानकर म्हणाले, "राजकारण आणि चळवळ यात खूप फरक असतो. चळवळ नेहमी शेतकरी आणि उपेक्षितांच्या बाजूने उभी राहते. मात्र, आम्हाला राजकारणात उजव्या बाजूला का उभे राहावे लागले. याचे कारण काँग्रेस आम्हाला महत्त्व देत नव्हती. समाजातील एखाद्याला मंत्री केले की, काम संपले, असे त्यांना वाटायचे. भाजपबरोबर माझे कोणतेही भांडण नाही. भाजप आजही आमदार, खासदार करायला तयार आहे. मात्र, मला कोणाच्या मागे जाऊन काही मिळवायचे नाही.
भाजप आणि काँग्रेसने चमच्यांची फौज जमा करण्याचे काम केले. मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही. तसे केले असते तर मी केंद्रीय मंत्री झालो असतो. स्वतःचा पक्ष काढीन आणि पक्षाच्या चिन्हावर पंतप्रधान होईन, घरी जाणार नाही आणि संसार उभा करणार नाही, तर देशाचा संसार उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मी १९९३ मध्ये सांगितले होते.
"सामाजिक आणि जातीय संघटना चालवणे सोपे असते. पण, पक्ष चालवणे कठीण आहे. जात म्हटले की, लोक लगेच एकत्र येतात. सर्व जातींना सोबत घेऊन जाणारा पक्षच पुढे जातो. रासपने ४ राज्यांमध्ये चांगले यश मिळवले आहे आणि आणखी २ राज्यांमध्ये चांगले यश मिळवून रासप हा काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष होईल. दिल्लीत ३१ मे रोजी अडीच कोटी रुपये खर्च करून पक्षाचे कार्यालय सुरू करणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले.