आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:45 IST2025-04-25T06:44:18+5:302025-04-25T06:45:05+5:30
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जगदाळे आणि गनबोटे यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वन केले

आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
पुणे - आम्ही निर्बल असल्याचे बघून दहशतवादी आमच्याकडे आले. आम्ही महिलांनी कपाळाच्या टिकल्या काढून टाकल्या, तरी आमच्या माणसांना त्यांनी मारले. त्यावेळी तिथे आमच्या मदतीला कोणीच नव्हते. आम्ही महिला आमचा जीव वाचवत तिथून पळत निघालो. ही घटना कधीही विसरू शकत नाही... अशी आपबीती मयत कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी संगीता गनबोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सांगितली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जगदाळे आणि गनबोटे यांच्या कुटुंबीयांचे त्यांच्या राहत्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी माजी महापौर अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. जगदाळे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हल्ल्यानंतर वेळेवर मदत मिळाली नाही. आरोग्य सेवा आणि सुरक्षा यंत्रणा पुरेशा नसल्यामुळे त्यांचा जीव गेला. हा गंभीर मुद्दा आपण संसदेत मांडावा, तसेच हा दहशतवादी हल्ला केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त झाली.
ड्रायव्हर अन् घोडेवाला मुस्लीम; दोघांनी मदत केली
आमचा ड्रायव्हरही मुस्लीम होता, त्याने खूप मदत केली. घोडेवालादेखील मुस्लीम होता. ते खाली गेलेले होते. गोळ्यांचा आवाज ऐकून जिवाची पर्वा न करता ते दोघे धावत परत आले. आम्ही जिवाच्या आकांताने पळत होतो. त्यांनी आम्हाला खूप मदत केली, असे संगीता गनबोटे यांनी सांगितले.