पुणे : मंगेशकर रुग्णालयात मृत्यू पावलेल्या तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, आता ही मदत भिसे कुटुंबीयांनी नाकारली आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली एक लाख रुपयांची आर्थिक मदतदेखील भिसे कुटुंबीयांनी नाकारली आहे. आम्हाला पैसे नको, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी भिसे कुटुंबीयांनी केली आहे.
यापुढे अशा घटना कधीही घडू नये, यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीदेखील भिसे कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे केली आहे. अंतर्गत समितीच्या नावाखाली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कुटुंबाची बदनामी केला आहे. याबाबत पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात तक्रारदेखील दाखल केली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने देखील या संबंधित कारवाई करण्याचे आदेश पोलिस आणि मेडिकल कौन्सिलला दिले आहेत. तनिषा भिसे यांची आयव्हीएफसारख्या ट्रिटमेंटची माहिती जगजाहीर केल्याने कुटुंबाची बदनामी झाली आहे. ही माहिती जाहीर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ रुग्णालयाने आमची बदनामी केली
दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाने अंतर्गत समितीच्या नावाखाली बदनामी केल्याचे भिसे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अंतर्गत समितीच्या अहवालामुळे तनिषा भिसे यांची आव्हीएफसारख्या ट्रिटमेंटची माहिती सार्वजनिक झाली. या अहवालामुळे अनेक चुकीचे प्रश्न निर्माण झाले आणि कुटुंबाला ट्रोल करण्यात आले. असे भिसे कुटुंबियांनी म्हटले आहे.