पुणे - जालना जिल्ह्यातील भोकरदन गावात कैलास बोराडे यांना मंदिरात प्रवेश केल्याने झालेल्या मारहाणीच्या घटनेला आता नवे वळण आले आहे. ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे.नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी एक व्हिडिओ दाखवला. यात कैलास बोराडे अर्धनग्न आणि मद्यधुंद अवस्थेत मंदिरात शिरल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे म्हणाले की, धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात मकोका कायद्यासारखा नवीन कायदा लागू करावा. त्यांनी सरकारला आवाहन केले की, विधिमंडळाच्या अधिवेशनात हा कायदा मंजूर करावा. अशी मागणी जरांगे यांनी केली.
यावर आज माध्यमांशी बोलतांना लक्ष्मण हाके म्हणाले,'मनोज जरांगे यांनी नुकतीच प्रेस घेतली त्यानंतर मी प्रेस घेतोय. एका धनगर तरुणाला जालना येथे जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण महाशिवरात्रीच्या दिवशीचे आहे. या प्रकरणात त्या तरुणाला मारहाण करण्यात आली असून या संबंधित मी पोलिसांना भेटलो. मी या प्रकरणात त्या तरुणाला न्याय मिळविण्यासाठी काम करतोय. बोराडे याला न्याय मिळालं पाहिजे अशी मागणी हाके यांनी केली आहे. आम्ही ज्यावेळी या तरुणाला न्याय मिळविण्याची मागणी केली त्यावेळी जरांगे यांनी बोराडेवर दारू पिण्याचे आरोप केले. पत्रकार परिषदेत जरांगे यांनी बोराडेचा दारू पिल्याचा व्हिडीओ दाखवलं,तो महादेव भक्त आहे,जवळ मंदिर आहे महाशिवरात्रीला गेला होता,मात्र त्या माणसाने समाज विघातक कृत्य केलेलं नाही.ते पुढे म्हणाले,'जरांगे पाटील या ना त्या कारणावरून राज्यात दोन जातीत भांडण लावण्याचे काम करत आहे.' असा आरोपही त्यांनी यावेळी केला. लक्षण हाके पुढे म्हणाले, अर्धवट कपड्यात गेला असा आरोप जरांगे करत आहेत.अश्लील हावभाव केला म्हणून मारणार का? मंदिरातील पुजारी आणि कुभमेळा मधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का ? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.जरांगे याच्या अजेंड्यावर ओबीसी नेते असतात मी सुद्धा आहे. सोशल मीडियावर रोहित पवार याची आय टी सेल जरांगे यांना पाठिंबा देत आहेत. जरांगे यांची गृहखात्यामार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. कैलास बोराडे याना न्याय मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय देणार असतील तर आम्ही त्याच्या विरोधात ही रस्त्यावर उतरू असा इशाराही हाके यांनी दिला.