बाबांच्या कार्याचे आम्ही केवळ दूत

By Admin | Updated: July 3, 2017 03:38 IST2017-07-03T03:38:06+5:302017-07-03T03:38:06+5:30

गरजवंतांनी बोलायच्या आत त्यांच्या गरजेची पूर्तता करणाऱ्यास समाजसेवक म्हणतात, अशी सोपी व्याख्या बाबांनी करून ठेवली होती. त्यामुळे

We are only messengers of Baba's work | बाबांच्या कार्याचे आम्ही केवळ दूत

बाबांच्या कार्याचे आम्ही केवळ दूत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गरजवंतांनी बोलायच्या आत त्यांच्या गरजेची पूर्तता करणाऱ्यास समाजसेवक म्हणतात, अशी सोपी व्याख्या बाबांनी करून ठेवली होती. त्यामुळे त्याच मार्गावरून आमच्या तीन पिढ्या बाबांचे कार्य पुढे नेत असून, बाबांनी आनंदवनाद्वारे उभे केलेले कार्य पुढे नेणारे आम्ही केवळ दूत आहोत, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली.
चिमणशेठ गुजराथी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे उद्यमगौरव आणि सेवागौरव पुरस्कारांचे वितरण डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुुख विश्वस्त मोहन गुजराथी, जयंत गुजराथी, कन्हैयालाल गुजराथी, सुभाषचंद्र देवी आणि डॉ. नलिनी गुजराथी आदी उपस्थित होते. या वेळी ‘दुर्लक्षित समाजघटकांच्या उत्कर्षाची हाक’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी आडगाव येथील विलास शिंदे, पाचगणी येथील किशोर व्होरा आणि मयूर व्होरा यांना उद्यमगौरव पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रासाठी धुळे येथील घासकडबी शैक्षणिक संस्थेचे नरेंद्र जोशी यांना सेवागौरव पुरस्कार आणि अहमदनगर येथील स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचा सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. आमटे म्हणाले, बाबा भौतिक सुखात कधीच रमले नाहीत. रस्त्यावरील कुष्ठरोग्याला घरी आणून, त्याची मलमपट्टी करून त्यांनी कार्याचा आरंभ केला. केवळ समाजाच्या दयेवर काम न करता बाबांनी कुष्ठरोग्यांमधील स्वाभिमान जागवला. पैशांची अफरातफर, महिलांवरील अत्याचार, चोरी आदी गोष्टींचा त्यांना तीव्र राग यायचा.
पूर्वी वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध नव्हत्या. परंतु, आदिवासींची सहनशक्ती अचंबित करणारी असल्याने प्रसंगी भूल न देता शंभर टाके देखील घालून शस्त्रक्रिया केल्या. आता शहरातून अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे समूह आनंदवनात येऊन रुग्णसेवा करतात. तरुणांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडत असल्याचे पाहून समाधान वाटते.

Web Title: We are only messengers of Baba's work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.