मेट्रो प्रकल्पात होणार पाण्याचा पुनर्वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:20+5:302021-01-08T04:33:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. ...

मेट्रो प्रकल्पात होणार पाण्याचा पुनर्वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (डीआरडीई) या संस्थेकडून घेण्यात येणार आहे.
या सामंजस्य करारावर मंगळवारी (दि. ५) महामेट्रोच्या कार्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डीआरडीईच्या बायोडिझास्टर टेक्नॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. गोयल आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
डॉ. दीक्षित म्हणाले, “महामेट्रोची पुण्यात ३१ स्थानके आहेत. त्याशिवाय अनेक आस्थापना आहेत. या सर्व ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सर्व पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. डीआरडीईने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला. त्यामुळे ते पुण्यातही वापरण्याचा निर्णय झाला. किमान ५ लाख नागरिकांकडून रोज महामेट्रोच्या स्थानकात पाणी वापरले जाईल, असा अंदाज घेऊन हा प्रकल्प उभारला जाईल.
त्यासाठी जमिनीखाली एका साठवूणक टाकीशिवाय वेगळी जागा लागणार नाही. यातून काही लाख लिटर पाण्याची रोजची बचत होणार आहे. तयार झालेले पाणी बागेसाठी झाडांना, वाहने, फरशी धुण्यासाठी वापरले जाणार आहे. ते पाणी पुन्हा प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. याच पद्धतीने पाण्याचे रिसायकलिंग होईल, असे डॉ. दीक्षित म्हणाले.
डॉ. गोयल यांनी सांगितले की, विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या साह्याने हे पाणी वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणचे वापरलेले पाणी एका टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. साधारण २४ तासांत ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर ते पाणी पुन्हा वापरता येईल. ‘डीआरडीई’चे हे तंत्रज्ञान आतापर्यंत विमानतळ, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी वापरण्यात आले आहे.
सैन्याचा तळ, सियाचीन सारख्या उंच, दुर्गम ठिकाणी जिथे पाण्याची टंचाई असते तिथेही हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवले असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. “मेट्रोची बांधकामे सध्या सुरू आहेत. ती करतानाच पाणी पुनर्वापरासाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी वेगळा खर्च होणार नाही, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.