पाणीपुरवठा करणारी टाकी कोसळली
By Admin | Updated: June 24, 2015 05:21 IST2015-06-24T05:21:09+5:302015-06-24T05:21:09+5:30
येथील जीवन प्राधिकरणाची पिण्याच्या पाणीपुरवठा करणारी जुनी टाकी मंगळवार (दि.२३) रोजी दुपारच्या सुमारास कोसळली.

पाणीपुरवठा करणारी टाकी कोसळली
देऊळगावराजे : येथील जीवन प्राधिकरणाची पिण्याच्या पाणीपुरवठा करणारी जुनी टाकी मंगळवार (दि.२३) रोजी दुपारच्या सुमारास कोसळली. सुदैवाने दुपारची वेळ असल्याकारणाने या घटनेत मात्र कुठलीही जीवितहानी घडली नाही.
गेल्या १५ दिवसांपूर्वी या टाकीचा एक खांब अज्ञात व्यक्तींनी तोडला होता. याबाबतची सचित्रवृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. ही पाणीपुरवठा टाकी धोकादायक असल्याची वस्तुस्थितीही मांडण्यात आली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने पंचायत समिती आणि पोलीस स्टेशन यांना टाकी धोकादायक असल्याची खबर देण्यात आली होती. पंचायत समितीने या टाकीची पाहणी करुन टाकी धोकादायक असल्याचे फलक लावण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. या घटनेनंतर १0 ते १५ दिवसात ही टाकी कोसळली.
सदर पाणीपुरवठा करणारी जुनी टाकी सुमारे १२ ते १५ वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा अंतर्गत बांधण्यात आली होती. तर गेल्या १५ दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी या टाकीचा एक खांब पूर्णपणे तोडल्याने टाकी तिरकी झाली होती. दरम्यान या अगोदर जुन्या टाकीतून गावासाठी पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु खांब तोडल्यानंतर सदर टाकीतून पाणीपुरवठा करणे बंद करण्यात आला होता. या घटनेचा पंचायत समितीमार्फत पंचनामा करण्याचे कामकाज सुरु होते. (वार्ताहर)