‘पिलाणवाडी’तील पाणीसाठा वाढला
By Admin | Updated: August 2, 2014 04:22 IST2014-08-02T04:22:38+5:302014-08-02T04:22:38+5:30
पिलाणवाडी (ता. पुरंदर) येथील जलाशयातील पाणीसाठा वाढल्याने येथून सुरू असणारी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन-चार दिवसांत सरू होणार आहे.

‘पिलाणवाडी’तील पाणीसाठा वाढला
खळद : पिलाणवाडी (ता. पुरंदर) येथील जलाशयातील पाणीसाठा वाढल्याने येथून सुरू असणारी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना येत्या तीन-चार दिवसांत सरू होणार आहे. त्यामुळे लाभार्थी गावांतील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे. मात्र, तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. बहुतांश धरणात क्षमतेच्या ५० टक्केपर्यंतही पाणीसाठा झाला नाही.
धरणातील उपयुक्त पाणीसाठा मृत साठ्यापेक्षाही कमी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून शिवरी प्रादेशिक योजना बंद होती. या योजनेवर अवलंबून असणाऱ्या शिवरी, खळद, वाळुंज, तक्रारवाडी, साकुर्डे, बेलसर या गावांतील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे, तर काही गावांत ट्रँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
या भागात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून, पेरण्याही झाल्या नाहीत. भूगर्भातील पाण्याची पातळीही खोलवर गेली असून, बहुतांश विहिरी, बोअरवेल कोरडे पडू लागले आहेत.
पिलाणवाडी जलाशय अद्याप भरले नसले नरी किमान पाणी योजना सुरू होईल, एवढा (३८.४८ द.ल.घ.फूट) पाणीसाठा धरणात आला आहे. पाणी योजना नक्की कधी सुरू होईल, याबाबत व्यवस्थापक रोहिदास रासकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी धरणात पाणीसाठा वाढला असून, तो दोन-तीन दिवसांत स्थिर होईल. तसेच, शिवरी येथील फिल्टर प्लांटमधील वाळू बदलण्याचेही काम सुरू असून, यात नवीन वाळू टाकल्यावर सोमवारपर्यंत ही योजना सुरू होऊ शकते, असे सांगितले. (वार्ताहर)