पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 02:18 AM2019-03-16T02:18:23+5:302019-03-16T02:18:30+5:30

पोलीसलाईनमधील नागरिकांची समस्या; पाणीपुरवठा विस्कळीत; नागरिकांना नाहक त्रास

Water in the police line once in three days | पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

पोलीस लाईनमध्ये येतेय तीन दिवसांतून एकदा पाणी

Next

पुणे : पोलीस लाईन या भागात दोन, तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. ते पाणी अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. असे त्या भागातील नागरिक म्हणत असून महापालिका पाणीपुरवठा अधिकारी दररोज पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करीत आहेत. पाणी नक्की जिरते कुठे, असा गंभीर प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.

सोमवार पेठ येथील पोलीस लाईनमध्ये सर्व शासकीय कर्मचारी राहतात. त्या ठिकाणी एकूण चार मजल्याच्या आठ इमारती असून ३२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक इमारतीवर महापालिकेने बांधून दिलेली एक टाकी आहे. गेले सहा महिने झाले, येथील नागरिकांना पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सोमवार पेठ पोलीस लाईनमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन-तीन दिवसांतून एकदाच पाणी येते. पाण्याची वेळ कधीही ठरलेली नसते. पाणी आले की अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ राहत नाही. महिलांना पाणी नसल्याने परिसरातील आजूबाजूला पाण्यासाठी फिरावे लागते. घरातील पाण्याची कामे करण्यासाठी पाण्याची वाट बघावी लागते. पाणीपुरवठा होत नाही, यासाठी नागरिकांनी नगरसेवक आणि आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली जात नाही. महानगरपालिकेने एक टाकी बांधून दिली होती. पण त्या टाकीचे पाणी पुरत नसल्याने नागरिकांनी आणखी टाकी बांधण्याची मागणी केली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार सिंटेक्सच्या टाक्या बांधून देण्यात आल्या. परंतु या टाक्यांची सध्याची अवस्था फारच बिकट आहे. त्यांना झाकण नसून फरशी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कधी कधी अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच महापालिकेकडून चार ते पाच वर्षांनी टाकीची स्वच्छता केली जाते. पाणीपुरवठा कधी तरी झाला तरी पाण्याचे प्रेशर फारच कमी असते.

यामुळे टाकी भरण्यास फारच वेळ लागतो. सायंकाळी पाण्यासाठी नागरिकांना या भागात खूप फिरावे लागते. नगरसेवक टँकरची सोय करून देतात. परंतु चारमजली इमारती असल्याने पहिल्या मजल्यावर पाणी घेऊन जाण्यास काही वाटत नाही. इतर वरच्या मजल्यावरील लोकांना पाणी तळापासून वर घेऊन जाण्यास खूप त्रास होत आहे.

सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये कुठलीही समस्या नाही. पण पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. येथे राहणारे सर्व नागरिक शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आम्हाला तक्रार करायलासुद्धा भीती वाटते. तरीही आमच्या प्रभागातील नगरसेवक, आमदार यांच्याकडे तक्रार केली असून दखल घेतली गेली नाही. पाण्याची ही गंभीर समस्या सोडवावी, अशी सर्व नागरिकांची मागणी आहे.
ऋषीकेश रोकडे , रहिवासी

पाण्यासाठी आंदोलन होत आहे. सोमवार पेठ पोलीस लाईनसहित, नाना पेठ, वायएमसीए, घोडमळा, किºहाडवाडा या सर्व ठिकाणी पाण्याची समस्या जाणवत आहे. पाणीपुरवठ्याच्या कमतरतेमुळे मी टँकरची सोय करून दिली आहे, असे स्थानिक नगरसेवकांनी सांगितले.

पूर्वी दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होत असे. आता मात्र सकाळच्या ११ ते २ या वेळेत पाणीपुरवठा होतो. सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आम्ही तपास केला असून त्या ठिकाणी व्यवस्थित पाणीपुरवठा होत आहे. पोलीस लाईन हा शेवटचा टप्पा असल्याने पाणी प्रेशर थोडेफार कमी असते. तसेच येथील टाक्या चौथ्या मजल्यावर असल्याने पाणी वर चढण्यास अडथळा होत आहे.
- सूर्यकांत जमदाडे,
उपअभियंता, स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र

दिवसातून सायंकाळी ४ ते ५ च्यादरम्यान कधी कधी पाणी येते. २० ते २५ मिनिटे पाणी असते. एवढ्या वेळात आम्हाला पाणी भरून घेता येत नाही. तसेच गेले सहा महिने झाले सर्व नागरिक इतर ठिकाणी पाणी भरण्यास जातात. दररोज टँकरचीसुद्धा सोय नसते. पाण्याच्या त्रासाची तक्रार करून नागरिक कंटाळले आहेत. महानगरपालिकेने यावर काहीतरी उपाय करावा. दिवसातून एकदा तरी ३, ४ तास आम्हाला पाणी मिळावे.
- सुनीता सुपेकर, रहिवासी

Web Title: Water in the police line once in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.