एटीएम कार्डद्वारे पाणी, लाभली आरोग्याची संजीवनी
By Admin | Updated: February 12, 2017 04:43 IST2017-02-12T04:43:12+5:302017-02-12T04:43:12+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे.

एटीएम कार्डद्वारे पाणी, लाभली आरोग्याची संजीवनी
भिगवण : राष्ट्रीय पेयजल योजनेतून सुरू झालेला शुद्ध पाणीपुरवठा करणारा प्रकल्प तक्रारवाडी ग्रामस्थांसाठी आरोग्याची जल संजीवनी ठरत आहे.
चार वर्षांपूर्वी चालू झालेल्या या योजनेतून एटीएम कार्डद्वारे गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारले आहे. शिवाय याच प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या ‘टाकाऊ’ पाण्यावर सुमारे २५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांमुळे परिसराला वनराईचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेतून १ आॅगस्ट २०१३ रोजी सर्वांना स्वच्छ पाणी मिळावे, या हेतूने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. तक्रारवाडी हे उजनी धरणाच्या कडेला पुनर्वसित झालेलं २१६६ लोकसंख्या असणार गाव आहे. या गावाला उजनीच्या पाणलोटक्षेत्रात विहीर खणून त्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. अशुद्ध आणि ११०० च्या पुढे असणाऱ्या टीडीएस पाण्यामुळे लोकांना पोटाचे विकार मुतखडा, मळमळणे, अतिसार इत्यादी असंख्य आजारांना तोंड द्यावे लागत होते. काही बोटावर मोजता येतील इतक्या लोकांकडे ‘फिल्टर’ची सुविधा उपलब्ध होती. परंतु सवसामान्य हा खर्च करू शकत नव्हते. हा नवीन प्रकल्प सुरू झाल्यापासून या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा मिळत आहे.
विविध आजारांतून लोकांची मुक्तता झाली आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली दिसून येत आहे. हा प्रकल्प गावच्या पूर्व बाजूला सुरू करण्यात आला असून गावातील ३०० कुटुंब या योजनेचा लाभ घेत आहेत.
या प्रकल्पाचा ‘मेंटेनन्स’ सुरळीतपणे चालावा या हेतूने सुरुवातीच्या काळात प्रत्येक कुटुंबाने १०० रुपयेप्रमाणे याचा मासिक पास ठेवण्यात आला होता. सदर योजना हायटेक करण्याच्या दृष्टीने आणि रोजच्या हिशोबातून सुटका व्हावी, या दिशेने वाटचाल करण्यासाठी एटीएम मशीन बसविण्यात आले आहे.
कार्ड रिचार्ज केल्यानंतर ००.२५ पैसे प्रतिलिटर प्रमाणे महिनाभर पाणी मिळत आहे. हा प्रकल्पावर सरपंच आणि ग्रामसेवक एका आॅपरेटरच्या माध्यमातून लक्ष देत आहेत. स्वच्छता करण्यासाठी हा प्रकल्प आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी बंद ठेवण्यात येतो. यामुळे लोकांचा एक दिवस कोरडा पाळण्याचे उद्दिष्ट आपोआप पूर्ण होते. परिणामी डेंगीला पायबंद बसण्यास मदत होते.
या प्रकल्पामुळे गावातील लोक पोटाच्या आजार मुक्त झाले. स्वच्छ पाणी मिळाले तर आजारचे प्रमाण कमी होते, असा डॉक्टर सल्ला देत असतात. या प्रकल्पातून निघणारे टाकाऊ पाणी वाया न जावू देता यावर सुमारे २५०० झाडांची लागवड केल्याची माहिती तक्रारवाडी गावच्या महिला सरपंच शोभाताई वाघ यांनी दिल्ज्ञ
या प्रकल्पाला भेट देण्यासाठी विविध ठिकाणहून ग्रामस्थ येतात. असे आरोग्यदायी प्रकल्प जिल्हाभर सुरू व्हावेत, असा मानस गावचे उपसरपंच प्रशांत वाघ यांनी व्यक्त केला. कमी पैशात पाणी मिळत असल्याने गोरगरीब नागरिकही याचा लाभ उठवीत आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यात हा प्रकल्प पथदर्शी ठरावा. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय ठरू शकतो, असे मत इंदापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी एम. के. बिचकुले यांनी व्यक्त केले.