पुण्यावर पाणीकपातीचे पुन्हा सावट?
By Admin | Updated: March 28, 2015 23:45 IST2015-03-28T23:45:16+5:302015-03-28T23:45:16+5:30
नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे.

पुण्यावर पाणीकपातीचे पुन्हा सावट?
पुणे : नेमीची येतो पावसाळा या म्हणी प्रमाणे नेमीची येते पाणी कपात म्हणण्याची वेळ यंदा पुन्हा एकदा पुणेकरांवर येणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पानशेत वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणार २७ मार्च अखेर १२.२५ टीएमसी पाणीसाठा शिल्ल्क असून मागील वर्षी याच दिवशी हा पाणीसाठी १३़२० टीएमसी होता. मात्र, त्यानंतरही जून महिन्यापासून पुणेकरांच्या पाण्यात १२ टक्के कपात करून एकवेळ पाणी देण्यास सुरूवात केली होती. मात्र, या वर्षी मागील वर्षीपेक्षा एक टीएमसी कमी पाणी असल्याने ही कपात एक महिना आधीच लागू करण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
धरणांमधील पाण्याने मागील वर्षी जून २०१४ महिन्यात तळ गाठला होता. त्यातच राज्यात वेळेवर हजेरी लावणा-या मान्सूनने मात्र दडी मारली होती. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस या प्रकल्पातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये अवघे २ टीएमसी पाणी उरले होते. त्यामुळे २८ जून पासून महापालिकेने शहरात दोन वेळ सुरू असलेल्या पाण्यात १२ टक्के कपात करून पाणी पुरवठा एकवेळ सुरू केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयातही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसच नसल्याने महापालिकेने ही पाणीकपात ३५ टक्क्यांवर नेत शहरात ११ जुलै पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. या वेळी या धरणांमध्ये अवघा १.१० टीएमसी पाणीसाठा होता. मात्र १२ जुलै नंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शहरातील पाणी कपात मागे घेण्यात आली. त्यानंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता.