पाणीबचतीचा संदेश
By Admin | Updated: July 2, 2017 03:24 IST2017-07-02T03:24:42+5:302017-07-02T03:24:42+5:30
कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. भरत

पाणीबचतीचा संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कविश्रेष्ठ कालिदासरचित ‘मेघदूत’ या अभिजात खंडकाव्याचे रंगमंचावर नाट्य स्वरूपात सादरीकरण करताना पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्यशैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे एक वैशिष्ट्य होते. इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली. नृत्य व संगीत स्वरूपात विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग सादर केले गेले. ‘प्रवेश’ या संस्थेने पहिल्यांदाच १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ अशा दोन भागांत नाटकस्वरूपात सादरीकरण केले.
आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून प्रवेश या संस्थेने नाट्यस्वरूपात सादर केला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी ‘मेघदूत’सारख्या नाटकाचे प्रयोग महत्त्वाचे असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. कोथरूड मतदारसंघात पाणी बचतीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबविण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात केली.
प्रथम पटवारी यांनी लेखन केले असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहेत. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रसिकांनी या प्रयोगाला मोठी गर्दी केली होती.
व्याकूळ यक्षाचा संदेश
रामगिरीतील विरहव्याकूळ यक्षाने अलंकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केलेली विनंती, या मार्गातील डोंगरदऱ्या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आणि उत्तरमेघात यक्षाने विरहात होरपळणाऱ्या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला.