सांडपाण्यामुळे फेसाळली नदी
By Admin | Updated: January 17, 2015 23:40 IST2015-01-17T23:40:05+5:302015-01-17T23:40:05+5:30
भीमा नदीच्या जलपात्रात पुणे शहर, पिंपरी चिंचवड या शहरातील मैलामिश्रित व औद्योागिक वसाहतीतील सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पात्र पूर्णपणे जलपर्णीने वेढलेले आहे.

सांडपाण्यामुळे फेसाळली नदी
रांजणगाव सांडस : भीमा नदीच्या जलपात्रात पुणे शहर, पिंपरी चिंचवड या शहरातील मैलामिश्रित व औद्योागिक वसाहतीतील सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पात्र पूर्णपणे जलपर्णीने वेढलेले आहे. त्यामुळे नदी फेसाळल्यासारखी दिसत आहे.
जलपर्णीमुळे नदीपात्राने हिरवी शाल पांघरलेली आहे की काय, असा भास होतो. परंतु, हीच जलपर्णी नदीकाठच्या गावांना धोक्याची घंटाच आहे. भीमा नदीस विस्तीर्ण व विस्तृत असे जलपात्र लाभलेले आहे. वाळकी रांजणगाव सांडस संगम या ठिकाणी मुळा-मुठा-भीमा या नद्यांचा संगम होतो. या नद्यांना बारामाही पाणी असते. कारण, या नद्यांच्या जलपात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे टाकून शेतीसाठी पाणी अडविले जाते. बंधाऱ्यास प्लेटा टाकल्यामुळे एका बंधाऱ्याचा पाण्याचा फुगारा दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचतो.
परंतु, या नदीकाठच्या गावांना डासांचा त्रास, कावीळ, मुतखडा, मलेरिया यांसारख्या रोगांना तोंड द्यावे लागत आहे. शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना हातपाय पाण्यात बुडवावे लागत असल्यामुळे अंगास खाज सुटणे, अंगावर लाल पुरळ उठणे यांसारख्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे.
जलपर्णीमुळे नदीपात्रातील जीवजंतू, मासेही मृत्युमुखी पडतात. परिणामी, पाणी फेसाळले जाते व उंच दूषित फेस पाहावयास मिळतो. महिन्यातून एक दिवस भारनियमन केले तर जलपर्णी वाहून जाईल.
४शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा वीज भारनियमन वेगवेगळया गावांत वेगवेगळा वेळ असल्याने वीज भारनियमन ज्या गावात आहे, तेथील विद्युत पंप बंद असतात. त्यामुळे नदीपात्रातील जलप्रवाहात थोड्या प्रमाणात वाढ होऊन बंधाऱ्याच्या प्लेटावरून पाण्याबरोबर जलपर्णीही वाहण्यास सुरुवात होते व बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूस खच (साठा) साचला जातो.
४नदीकाठच्या शिरूर व दौंड तालुक्यातील गावांना एकाच वेळी महिन्यातून एक दिवस भारनियमन केले तर जलपर्णी वाहून जाण्यास मदत होईल व त्यापासून होणारा त्रासही कमी होईल, अशी मागणी जागरूक नागरिकांनी केलेली आहे.