कोरोनामुक्तीनंतरचे असे होते ‘त्यांचे’ एक वर्ष...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:37+5:302021-03-09T04:12:37+5:30

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : ‘‘दुबईहून परत आल्यावर एक-दोन दिवसांमध्ये ताप, सर्दीसारखी लक्षणे दिसू लागल्याने आम्ही डॉक्टरकडे गेलो. कोरोनाच्या बातम्या ...

This was 'their' one year after coronation ...! | कोरोनामुक्तीनंतरचे असे होते ‘त्यांचे’ एक वर्ष...!

कोरोनामुक्तीनंतरचे असे होते ‘त्यांचे’ एक वर्ष...!

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : ‘‘दुबईहून परत आल्यावर एक-दोन दिवसांमध्ये ताप, सर्दीसारखी लक्षणे दिसू लागल्याने आम्ही डॉक्टरकडे गेलो. कोरोनाच्या बातम्या कानावर येत होत्या. त्यामुळे चाचणी करुन घेण्यासाठी आपणहून नायडू रुग्णालयात दाखल झालो. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विलगीकरणाचे सर्व नियम पाळले. रुग्णालयातून घरी आल्यानंतर आजतागायत सर्व नियम पाळले. पोस्ट कोव्हिडचा त्रास जाणवला नाही. आता दैनंदिन जीवन सुरळीत झाले आहे. अजूनही आम्ही मास्क लावणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आहोत. नियम पाळले तर आजारातून सहीसलामत बाहेर पडता येणे शक्य आहे,’’ अशा शब्दांत महाराष्ट्रातील पहिल्या रुग्णाने कोरोनाग्रस्त ते कोरोनामुक्तीचा वर्षभराचा प्रवास उलगडला.

चीनमधून भारतात कोरोना नावाच्या विषाणूने प्रवेश केलाय आणि कोरोना नावाचा साथीचा आजार फोफावतोय एवढ्याच बातम्या कानावर पडत होत्या...अशातच ९ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात सापडला आणि प्रशासनाची अक्षरश: झोप उडाली. दुबईहून पुण्यात परतलेले जोडपे आणि त्यांची मुलगी यांच्यामध्ये कोरोनाचे निदान झाले. त्यांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागली. आज ९ मार्च २०२१...कोरोनाचा पुण्यात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण होतंय. आॅक्टोबर ते जानेवारी या काळात कोरोना काहीसा आटोक्यात आला असे वाटत असतानाच कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. दररोजची रुग्णसंख्या १००० च्या जवळ जाऊन ठेपली आहे. कोरोना वाढतोय तसा निष्काळजीपणाही वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वांनी कोरोनाचे नियम पाळायला हवेत, हाच संदेश पुण्यातील पहिल्या कोरोनामुक्त कुटुंबाने दिला आहे.

चीनमधील विषाणूचे अनेक व्हिडिओ मोबाईलवर फिरत होते. त्यामुळे आम्ही नायडू रुग्णालयात दाखल झाल्यावर आमच्यासह नातेवाईक, आप्तेष्ट सर्वांचेच धाबे दणाणले होते. आमचे कुटुंब रुग्णालयातून सहीसलामत घरी परतणार की नाही, याबद्दल सर्वांनाच साशंकता होती. मात्र, दवाखान्यात असताना घसा बसणे, सर्दी असा काही त्रास होत नव्हता. आहार, व्यायाम, मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा, एकमेकांशी सकारात्मक गप्पा मारणे हे सर्व नियम पाळले. आपण यातून बाहेर पडणार, अशी खात्री मनाशी बाळगली. आम्हाला झालेला कोरोना सौम्य लक्षणांचा होता, हे आता समजते आहे.’

-----------------

पोस्ट कोव्हिडचा त्रास नाही

ते कुटुंबीय म्हणाले, ‘वर्षभरात थकवा येणे, दम लागणे असा कोणताही त्रास जाणवला नाही. आॅक्टोबरपासून कामावर रुजू झालो. कामाच्या निमित्ताने विविध राज्यांमध्ये प्रवास सुरु आहे. सुरुवातीला क्वारंटाईनचे सर्व नियम पाळले. अजूनही आहार, व्यायामाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत आहोत. त्यामुळे प्रतिकारशक्तीही सुधारली आहे. एकदा कोरोना झाला म्हणजे आता आपल्याला पुन्हा काही होणार नाही, हा विचारही मनाला कधी शिवला नाही. मुलीचे अजून वर्क फ्रॉम होम सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरु आहे. आम्ही फिरायला जातो, ट्रेकिंग करतो. कधीही त्रास झाला नाही की थकवा जाणवला नाही. ’

--------------

रक्त तपासणी आणि प्लाझ्मा दान

डिस्चार्ज मिळाल्यानंतर ५ मे २०२० रोजी पहिल्यांदा प्लाझ्मा दान केले. त्यावेळी ससूनमध्ये प्लाझ्मा थेरपीचे मशीन आल्याने चाचणीसाठी प्लाझ्मा दिला. त्यानंतर दोन वेळा प्लाझ्मा दान केले. राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतील संशोधनासाठी ५-६ वेळा रक्ताचे नमुने घेण्यात आले. कोरोना होऊन गेल्यानंतर शरीरात काय बदल होतात, यासाठी सप्टेंबरपर्यंत तपासणी सुरु होती. अद्याप लसीकरण झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले.

-------------------------

पुण्यातच का वाढतोय कोरोना?

कामानिमित्त राजस्थानला दोन-तीन वेळा जाणे झाले. तिथे कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या खूप कमी आहे. सुरुवातीपासून महाराष्ट्र, केरळ आणि दिल्ली ही राज्येच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहेत. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत कोरोना सातत्याने वाढतो आहे. पुण्याचे वातावरण संतुलित आहे. तरीही पुण्यातच कोरोना का वाढतोय, हा प्रश्न नेहमी सतावतो. लोकांनी काळजी घेणे खूप गरजेचे आहे, असे या कुटुंबाने आवाहन केेले.

----------------------------

Web Title: This was 'their' one year after coronation ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.