अंदुरे आणि कळसकर आमच्या बरोबर होते हे सीबीआय, जिल्हा न्यायालयाला कळविले होते का?
By नम्रता फडणीस | Updated: January 16, 2024 21:35 IST2024-01-16T21:35:19+5:302024-01-16T21:35:37+5:30
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्याच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने भाऊ सचिन अंदुरे आणि ...

अंदुरे आणि कळसकर आमच्या बरोबर होते हे सीबीआय, जिल्हा न्यायालयाला कळविले होते का?
पुणे: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्याच्या दिवशी रक्षाबंधन असल्याने भाऊ सचिन अंदुरे आणि शरद
कळसकर हे आमच्या बरोबर होते ही घटना तुम्ही सीबीआय, जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालयाला कळविली होती का? असा प्रश्न अंदुरे व कळसकरच्या बहिणींना उलट तपासणी दरम्यान विचारण्यात आला. त्यावर दोघींनी ' नाही' असे उत्तर दिले.
मग तुमचा नवरा, वडील यांना तसे करायला सांगितले का? वकिलांना सांगून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्या असे सांगितलेत का?
त्यावरही त्या 'नाही 'चं म्हणाल्या, अशी माहिती सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे.डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला.
त्यादिवशी रक्षाबंधन होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आरोपी शरद कळसकर औरंगाबादला तर सचिन अंदुरे अकोल्यात आमच्यासमवेत होते, अशी साक्ष कळसकर आणि अंदुरे यांच्या बहिणींनी न्यायालयात दिली होती. त्यावर सीबीआय वकिलांकडून मंगळवारी (दि.16) बहिणींची उलट तपासणी घेण्यात आली. तुमचा भाऊ या केसमधून सुटावा अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न बहिणींना विचारला असता त्यांनी होकार दिला असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
या केसची पूढील सुनावणी दि.24 जानेवारी रोजी होणार आहे. बचाव पक्षाने आणखी एक साक्षीदार पुढच्या सुनावणीदरम्यान हजर करण्याचा अर्ज न्यायालयात केला आहे. औरंगाबादच्या एरिगेशन डिपार्टमेंटचे डेप्युटी इंजिनिअर यांना साक्ष देण्यासाठी बोलावले आहे. हा अर्ज मंजूर करुन घेत त्यांना समन्स काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.