दरम्यान, कानपूरजवळील बिठूरस्थित शेवटचे पेशवे दुसरे बाजीरावांचा मुलगा नानासाहेब यांची वार्षिक पेन्शन इंग्रजांनी बंद केलेली. अशातच अजिमुल्लाना नानासाहेबांनी आपल्या दरबारात सल्लागार म्हणून रुजू केले. येथे अजिमुल्ला घोडेस्वारी, शस्त्रविद्याही शिकले. १८५३ मध्ये इंग्रज दरबारी नानासाहेबांवरील अन्याय मांडण्यासाठी अजिमुल्ला खान त्यांचे प्रतिनिधी-वकील म्हणून
लंडनला गेले. त्यांनी नानासाहेबांची बाजू जोरदारपणे मांडली. पण दुर्दैवाने निकाल विरुद्ध गेला.
१८५७ मध्ये नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी तसेच अनेक संस्थानिक, इंग्रजी फौजेतील हिंदी सैनिक, इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या तयारीत असताना अजिमुल्ला नानासाहेबांच्या सैन्यदलातील महत्त्वाचे अधिकारी झाले. स्वातंत्र्य संग्रामातील कानपूरजवळील युद्धात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजिमुल्ला खान विद्वान, लढवय्ये होतेच, तर उत्तम कवीही होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात त्यांनी लिहिलेले,
हम है इसके मालिक, हिंदुस्थान हमारा |
हिंदू मुसलमां, सिख हमारा, भाई भाई प्यारा |
यह है आजादी का झंडा, इसे सलाम हमारा|
हे ध्वजगीत आधुनिक भारताच्या इतिहासातील पहिले ध्वजगीत मानले जाते .