सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकी
By Admin | Updated: January 12, 2017 03:28 IST2017-01-12T03:28:36+5:302017-01-12T03:28:36+5:30
शासकीय रुग्णालयातील कारभार सोपा व्हावा आणि येथील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण

सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकी
पुणे : शासकीय रुग्णालयातील कारभार सोपा व्हावा आणि येथील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे ससून शासकीय रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकी मिळणार असून, त्यांना सुसंवाद साधून आपल्या अडचणी सोडविणे शक्य होणार आहे.
मागील काही वर्षांत डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर निवासी डॉक्टरांच्या संघटनेकडून (मार्ड) डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी शासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, २ वर्षांपूर्वी सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकी देण्यात यावेत, असा निर्णय झाला होता. त्यानुसार राज्यभरातील १२ रुग्णालयांतील सुरक्षारक्षकांना वॉकीटॉकी देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी सांगितले.
याबाबत ससून शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णाच्या नातेवाइकांची गर्दी, रुग्णालयात ऐन वेळी येणाऱ्या अडचणी यांचे योग्य ते नियोजन करण्यासाठी सुरक्षारक्षकांकडे वॉकीटॉकी असणे फायद्याचे होईल.
येथे तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा रक्षक काम करतात. मात्र, एका पाळीत ४० सुरक्षारक्षक असतात आणि तेही वेगवेगळ्या ठिकाणी असतात. यामुळे रुग्णाला अॅडमिट करण्याच्या वॉर्डात तसेच इतर संवेदनशील असलेले कॅजुअल्टी वॉर्ड, न्यायवैद्यकशास्त्र विभाग (डेड हाउस), गेट, पार्किंग येथे नेहमीच रुग्णांच्या नातेवाईक आणि डॉक्टर, सुरक्षारक्षक यांच्याशी वादावादीचे प्रसंग उद्भवतात. तसेच काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना शस्त्रधारी पोलीस पुरविण्याचे आणि इतर सुरक्षा साधणे पुरविण्याचेही आदेश दिले होते.
महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणच्या सुरक्षारक्षकांना हे साधन पुरविण्यात येणार असून एखाद्या ठिकाणी काही विपरीत घटना घडल्यास तेथील सुरक्षारक्षक त्वरित वॉकीटॉकीवरून सुरक्षा पर्यवेक्षकाला आणि पर्यवेक्षक इतर ठिकाणांच्या सुरक्षारक्षकांना त्याची माहिती देईल. यामुळे तेथे त्वरित इतर सुरक्षारक्षक येऊन तेथील परिस्थिती आटोक्यात आणतील, हा त्यामागील उद्देश आहे, अशी माहिती येथील पर्यवेक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)
ससून रुग्णालयाचा परिसर मोठा असून त्या ठिकाणी साधारण १०० ते १२० सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. त्यांना आपसात संवाद साधण्यासाठी सध्या ३६ वॉकीटॉकी देण्यात आले असून, प्रशासनाचे काम सुलभ होण्यास त्याचा निश्चितच फायदा होईल.
२२एकरांच्या आवारात असलेल्या ससून रूग्णालयात रुग्णांची नेहमीच प्रचंड वर्दळ असते. त्यातच रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते.
सध्या पुण्यातील ससूनसह इतर शासकीय रुग्णालयांना मिळून १०० ते १५० वॉकीटॉकी देण्यात आले आहेत. रुग्णालयातील अपघात टळून कामकाज सुरळीत व्हावे, हा यामागील हेतू आहे. वॉकीटॉकी घेण्यात आलेल्या कंपनीकडून सुरक्षारक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले असून, लवकरच ही सुविधा वापरात येईल.
- डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय शिक्षण व
संशोधन संचालनालय, संचालक