वारकऱ्यांना पिठलं-भाकरीची मेजवानी
By Admin | Updated: July 3, 2016 03:46 IST2016-07-03T03:46:54+5:302016-07-03T03:46:54+5:30
श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या खास पसंतीची पिठलं-भाकरीची मेजवानी देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी एक

वारकऱ्यांना पिठलं-भाकरीची मेजवानी
यवत : श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळा यवत मुक्कामी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या खास पसंतीची पिठलं-भाकरीची मेजवानी देण्यात आली. येथील ग्रामस्थांनी एक ते दीड लाख भाकरी व दीड हजार किलोचे पिठले बनवले होते.
पुणे व शहरी परिसरातील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात प्रवेश करतो, तो यवतमधील श्री काळभैरवनाथ मंदिरात. दौंड तालुक्यातील पहिला मुक्काम असतो. मागील अनेक वर्षांपासून यवतमधील ग्रामस्थ श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामी चांगली व्यवस्था ठेवत आले आहेत. यातील एक वेगळा आणि वारकऱ्यांचा आवडता विषय म्हणजे येथील मुक्कामात वारकऱ्यांना मिळणारी मेजवानी. संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात राज्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. देहू येथून पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी सोहळा पहिले काही मुक्काम शहरी परिसरात असल्याने तेथेही वारकऱ्यांना चांगली मेजवानी दिली जाते. मात्र यवत मुक्कामी ग्रामीण भागातील लोकांना आवडणारी पिठले-भाकरीची मेजवानी असते. यामुळे वारीत कधी घरातल्याप्रमाणे जेवणाचा आनंद घेता येतोय, याची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. यवतमध्ये पिठलं-भाकरी तयार करण्याची देखील अनोखी प्रथा आहे.
यवतच्या पिठलं-भाकरीची चव महाराष्ट्रात प्रसिद्ध
संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात यवत मुक्कामी वारकऱ्यांना दिली जाणारी पिठलं-भाकरीची मेजवानी चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांमधून येणारे हजारो नागरिकदेखील पिठले भाकरीचा आस्वाद घेऊनच जात असतात. आज (दि. २) मंदिरात पिठले भाकरीची तयारी सुरू असताना पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनादेखील याचे कुतूहल वाटले. त्यांनी तत्परतेने त्यांनी मोबाईलमध्ये पिठले तयार करतानाचे चित्रीकरण केले.