टँकर मंजुरीची जिरायती भागाला प्रतीक्षा
By Admin | Updated: April 14, 2017 04:21 IST2017-04-14T04:21:09+5:302017-04-14T04:21:09+5:30
बारामतीच्या जिरायती भागातील गावांमधून टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी रजेवर असल्याने शासनदरबारी

टँकर मंजुरीची जिरायती भागाला प्रतीक्षा
बारामती : बारामतीच्या जिरायती भागातील गावांमधून टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे येत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी रजेवर असल्याने शासनदरबारी हे टँकर मागणीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे टँकरच्या पाण्यासाठी जिरायती भागाला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार दिले होते; परंतु तहसीलदारांचे ते अधिकार काढून घेऊन ते प्रस्ताव थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्याने टंचाईग्रस्त गावांची फरफट होताना दिसत आहे. यंदा उन्हाळ्याची तीव्रता मार्च महिन्यापासूनच अधिक झाली. पावसाळ्यात कमी झालेला पाऊस; त्यामुळे जिरायती भागातील फेब्रुवारी महिन्यापासूनच आटत चाललेले पाण्याचे स्रोत व सातत्याने कमी होत चाललेली भूजलपातळी यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदादेखील पाण्याचा प्रश्न जिरायती भागात गंभीर झाला आहे. मागील वर्षीच्या तीव्र दुष्काळात बारामती तालुक्यातील ६४ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. विहिरी, कूपनलिका, विंधनविहिरी आदींची खालावलेली पाणीपातळी चिंतेचा विषय आहे. या भागातील जनतेला दूरवरून पाणी आणावे लागते. विशेष म्हणजे, जे पाणी मिळते तेही शुद्ध असेलच, याची खात्री नसल्याने रोगराई होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर, जिरायती भागातून टँकरची मागणी वाढतच चालली आहे.
ज्या भागात टंचाईग्रस्त उपाययोजना राबविणे शक्य नाही, अशा ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. प्रत्यक्षात ज्या गावात टंचाई निवारणाच्या उपाययोजना केल्या आहेत; मात्र त्या फोल ठरल्या आहेत. तेथूनही पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात टँकरची मागणी होणार आहे. (प्रतिनिधी)
टँकरसाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून
तालुक्यातील जिरायती पट्ट्यात पाच वर्षांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. खरीप व रब्बीचे सलग दोन हंगाम वाया गेले आहेत. या वर्षी ज्वारीच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी ज्वारीचे बाटूकही हाती लागले नाही. काळखेरवाडी, मुर्टी, देऊळगाव रसाळ, सावळ आदी गावांच्या टँकर प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या ठिकाणी अद्याप टँकर सुरू झाले नाहीत. जैनकवाडी, भोंडवेवाडी, मोराळवाडी, मुढाळे, पारवडी, जळगाव सुपे, सोनवडी, जराडवाडी, सिद्धेश्वर निंबोडी, जोगवडी, कटफळ, आंबी खुर्द आदी गावांमधून १५ प्रस्ताव पंचायत समितीला आले आहेत. टँकरमुंजुरीसाठी हे प्रस्ताव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहेत.
जिल्ह्यातील नागरिक तहानलेलेच
पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र जिल्हाधिकारी सौरभ राव हे तब्येत बरी नसल्याने रजेवर आहेत. त्यामुळे टॅँकर प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले आहे. जिल्ह्यातील एकमेव पुरंदर तालुक्यातील ४ गावे आणि ३९ वाड्यावस्त्यांसाठी ९ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. इतर तालुक्यांची मागणी आहे. मात्र प्रस्ताव मंजूर होत नसल्याने नागरिकांची पाणीसाठी पायपीट सुरू आहे. जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील १२ प्रस्ताव दाखल झाले होते. मात्र ६ टॅँकर मंजूर झाल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. तसेच भोर १५ टॅँकरची मागणी आहे. परंतु अद्याप एकही मंजूर झाला नाही. तर शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई आणि मिडगुलवाडी या दोन गावांसाठी प्रस्ताव दाखल असूनही अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्याचबरोबर बारामती तालुक्यातून ११ टॅँकची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे रणरणत्या उन्हात नागरिकांची पाण्यासाठी होरपळ सुरू आहे.
आंबेगावात
पाणीटंचाई
मंचर : आंबेगाव तालुक्यातील लौकी, थोरांदळे, जाधववाडी या गावांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. डिंभे धरणाच्या घोड शाखेला तातडीने पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
डिंभे धरणाचा डावा कालवा कळंब गावच्या हद्दीतून गेला आहे. लौकी, थोरांदळे, जाधववाडी या गावांसाठी डाव्या कालव्याला पाणी नेण्यासाठी घोड शाखा कालवा गेला आहे. दीड महिने झाले या कालव्याला पाणी सोडण्यात आलेले नाही. यापूर्वी २६ फेबु्रवारीपर्यंत पाणी सोडले होते. त्यानंतर घोड कालव्याला पाणी सोडण्यात आलेले नाही. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात लौकी ग्रामपंचायतीने पत्र दिले आहे.
सध्या उन्हाचा कडाका वाढला असून, पाण्याचे स्रोत कमी होऊ लागले आहेत. पिकांसाठी पाणी कमी पडू लागले आहे. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. लौकी गाव घोड नदीपासून लांबवर आहे. हे गाव डोंगरी भागात असल्याने जानेवारी महिन्यापासून पाण्याची समस्या जाणवते.
जिरायती भागातून पंचायत समितीमार्फत आलेले टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. मंजुरी मिळताच जिरायती भागात टँकर सुरू करण्यात येतील.
- हनुमंत पाटील
तहसीलदार,
बारामती