‘अग्निशामक’ संग्रहालयाला प्रतीक्षा दर्शकांची
By Admin | Updated: February 6, 2017 06:22 IST2017-02-06T06:22:02+5:302017-02-06T06:22:02+5:30
आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्त्वाची बचावकार्ये असोत पुणे अग्निशामक दलाचे जिगरबाज अधिकारी आणि जवान धावून जातात.

‘अग्निशामक’ संग्रहालयाला प्रतीक्षा दर्शकांची
पुणे : आगीचे भीषण तांडव असो की नैसर्गिक आपत्ती असो, अपघात असो की महत्त्वाची बचावकार्ये असोत पुणे अग्निशामक दलाचे जिगरबाज अधिकारी आणि जवान धावून जातात. पुणे अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून ते आजवरच्या इतिहासाची झलक दाखवणारे आणि कर्तृत्वशाली कामगिरींचा लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन अद्यापही दर्शकांच्या प्रतीक्षेत आहे. नागरिकांना हे संग्रहालय पाहण्यासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे.
अग्निशामक दलाच्या एरंडवणा केंद्रामध्ये हे संग्रहालय महापालिकेमार्फत उभारण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. पुणे नगरपालिकेची १८५६मध्ये स्थापना झाली. १८८४पर्यंत सार्वजनिक सुरक्षेचे काम शासनाकडे होते. त्या दरम्यानच्या आगीच्या घटनांना कसे तोंड देण्यात आले याचा इतिहास उपलब्ध नाही. मात्र, १८८४ ते १९१४ या काळायत हातपंप अथवा मॅन्युअल इंजिनाचा वापर केला जात होता. दूरध्वनीची व्यवस्था नसल्याने धावत जाऊन अथवा शिटी वाजवत जाऊन वर्दी द्यावी लागत असे. १९१२-१३मध्ये नगरपालिकेने २ लँड स्टीम फायर खरेदी केले. त्यानंतर बैलगाडीमधून ओढून न्यावे लागणारे हे यंत्र १९२४मध्ये मोटारीमध्ये बसवण्यात आले. १९४२मध्ये पुणे नगरपालिका, उपनगर विभाग आणि कॅन्टोन्मेंट विभागांनी एकत्रित फायरवाला सहकारी संघ स्थापन केला.
१९५०मध्ये महापालिकेची स्थापना झाल्यावर अनेक छोटी खेडी, गावे मनपाच्या हद्दीत आली. त्यावेळी ६ हॉर्सपॉवरचे ५ पोर्टेबल पंप, २ टे्रलर पंप, ४५० गॅलन पाणी वाहून नेणारे २ वॉटर टँकर अशी साधने घेण्यात आली. कालानुरुप अग्निशामक दलाचे स्वरूप विस्तारत गेले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अधिकाधिक पदे भरण्यात आली. सध्या पुणे अग्निशामक दलात १४ केंद्रे कार्यरत असून, काही केंद्र प्रस्तावित आहेत. अग्निशामक दलाने २००९ ते २०१४ या कालावधीत ३० हजार आगीच्या घटनांचा सामना केला आहे.
या संग्रहालयामध्ये अग्निशामक दलाचा इतिहास, कायदे आणि घटनांची माहिती देण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या स्थापनेपासून वापरण्यात आलेली वाहने, साधने यांचीही माहिती देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय अग्निशमन सेवा अकादमी व महाविद्यालयाची तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी प्राण पणाला लावून सामना केलेल्या आगीचा प्रमुख घटनांची माहिती, वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांचाही संग्रहालयात समावेश केला आहे. आपत्ती आलीच तर काय करावे याचेही मार्गदर्शन याठिकाणी पाहायला मिळते.
हे संग्रहालय म्हणजे पुणेकरांच्या रक्षणासाठी सज्ज अग्निशामक दलाच्या जिगरबाज कामगिरीचा इतिहास आहे. जवानांच्या सोईसुविधा, सेवांकडे दुर्लक्ष केले जाते. जवानांकडे होणारे दुर्लक्ष एकवेळ मान्य आहे, मात्र त्यांचे कर्तृत्व तरी नाकारू नका, अशी प्रतिक्रिया जवानांमधून दिली जाते. येथे उपाययोजना राबवण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)